'या' राज्यात पेट्रोलपेक्षा डिझेल महाग...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 08:20 AM2018-10-22T08:20:55+5:302018-10-22T08:28:57+5:30
देशभरात पेट्रोलच्या किंमती या काही पैशांनी नव्हे तर काही रुपयांनी डिझेलपेक्षा जास्त आहेत.
भुवनेश्वर : गेल्या काही महिन्यांपासून देशभरात पेट्रोल, डिझेलच्या दरांनी नवनवे उच्चांक नोंदवले असताना मागील आठवड्यात इंधनाचे दर काही पैशांनी कमी होत आहेत. मात्र, इंधनदराच्या बाबतीत एक अनोखा विक्रम ओडिशाच्या नावावर नोंद झाला आहे.
देशभरात पेट्रोलच्या किंमती या काही पैशांनी नव्हे तर काही रुपयांनी डिझेलपेक्षा जास्त आहेत. मात्र, ओडिशामध्ये डिझेलची किंमत ही पेट्रोलपेक्षा जास्त झाली आहे. असे देशात पहिल्यांदाच घडले आहे. याला कारणही तसेच आहे. इतर राज्यांमध्ये डिझेलपेक्षा पेट्रोलवर व्हॅट जास्त असल्याने पेट्रोलच्या किंमती या डिझेलपेक्षा जादा असतात. मात्र, ओडिशामध्ये पेट्रोल आणि डिझेलवर सारखाच म्हणजेच 26 टक्के व्हॅट आकारला जातो. यामुळे तेथील पेट्रोल डिझेलच्या किंमती सारख्या झाल्या आहेत.
केंद्र सरकारने नुकतीच इंधनावरील किंमत 2.5 रुपयांनी कमी केली होती. तसेच राज्यांनाही कमी करण्याचे आवाहन केले होते. मात्र, ओडिशा सरकारने काही किंमती कमी केल्या नव्हत्या. काल ओडिशामध्ये पेट्रोलची किंमत 80.57 रुपये, तर डिझेलची किंमत 80.69 रुपये होती. या किंमतीमध्ये 12 पैशांचा फरक आहे. तर 20 ऑक्टोबरला 80.82 आणि डिझेलची किंमत 80.88 रुपये होती.