Petrol, Diesel Price: पेट्रोल सोडा, पाठोपाठ डिझेलनेही ठोकले शतक; राजस्थानमध्ये रचला विक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 06:42 AM2021-06-13T06:42:50+5:302021-06-13T06:43:18+5:30
Fuel prices hiked again: मुंबईत पेट्राेल १०२.३० रुपये तर डिझेल ९४.३९ रुपये प्रतिलीटर झाले. दिल्लीत हेच दर अनुक्रमे ९६.१२ रुपये आणि ८६.९८ रुपये प्रतिलीटर झाले. त्यापाठाेपाठ काेलकाता येथे पेट्राेल ९६.०६ रुपये तर डिझेलचे दर ८९.८३ रुपये प्रतिलीटर झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : काेराेनाच्या संकटात महागाईने हाेरपळलेल्या जनतेला तेल कंपन्यांनी पुन्हा पेट्राेल आणि डिझेल दरवाढीचा झटका दिला आहे. या दरवाढीनंतर प्रथमच पेट्राेल आणि डिझेलचे दर शंभरीपार गेले आहेत. तर काही ठिकाणी डिझेलचे दर शंभरीच्या उंबरठ्यावर आहेत. डिझेल दरवाढीमुळे महागाई वाढण्याची भीती आहे.
तेल वितरण कंपन्यांनी पेट्राेल आणि डिझेलची अनुक्रमे २७ आणि २३ पैशांची दरवाढ केली.
मुंबईत पेट्राेल १०२.३० रुपये तर डिझेल ९४.३९ रुपये प्रतिलीटर झाले. दिल्लीत हेच दर अनुक्रमे ९६.१२ रुपये आणि ८६.९८ रुपये प्रतिलीटर झाले. त्यापाठाेपाठ काेलकाता येथे पेट्राेल ९६.०६ रुपये तर डिझेलचे दर ८९.८३ रुपये प्रतिलीटर झाले.
महाराष्ट्रासह राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, ओडिशा, मणिपूर, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि लडाख या ठिकाणी पेट्राेलने शंभरी गाठली आहे.
तेल वितरण कंपन्यांनी ४ मेपासून आतापर्यंत २४ वेळा दरवाढ केलेली आहे.
४ मेपासून पेट्राेलची ५.७२ रुपये तर डिझेलची ६.२५ रुपयांनी दरवाढ झाली आहे.
राजस्थानाच्या श्रीगंगानगर येथे पेट्राेलचे दर देशात सर्वाधिक १०७.२३ रुपये प्रतिलीटरवर पाेहाेचले.
डिझेलचे प्रथमच शतक : देशात प्रथमच डिझेलचे दर १०० रुपयांवर पाेहाेचले आहेत. राजस्थानच्या श्रीगंगानगर येथे डिझेलचे दर १००.०६ रुपये प्रतिलीटर पाेहाेचले. त्यापाठाेपाठ ओडिशामध्ये मलकानगिरी येथे डिझेलचे दर ९९.७५ रुपये प्रतिलीटर हाेते. राजस्थानातील हनुमानगढ आणि ओडिशातील काेरापूट येथेही डिझेलचे दर शंभरीच्या उंबरठ्यावर आहेत.