वंदे भारत अन् अमृत भारत ट्रेनमध्ये नेमका फरक काय? प्रवाशांसाठी का खास असेल? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 01:24 PM2023-12-29T13:24:15+5:302023-12-29T13:27:29+5:30
Difference Between Vande Bharat Express And Amrit Bharat Train Full Details: पंतप्रधान मोदी दोन अमृत भारत ट्रेनचे लोकार्पण करणार आहेत. पाहा, डिटेल्स...
Difference Between Vande Bharat Express And Amrit Bharat Train Full Details ( Marathi News ): पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. अयोध्येत रेल्वे स्थानक तसेच आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. याशिवाय, काही मार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेस आणि अमृत भारत ट्रेन यांना हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहेत. वंदे भारत एक्स्प्रेसनंतर अमृत भारत ट्रेनविषयी प्रवाशांमध्ये मोठी उत्सुकता असल्याचे सांगितले जात आहे. या दोन्ही ट्रेनमध्ये नेमका फरक काय आहे, प्रवाशांसाठी अमृत भारत ट्रेन कशी खास ठरणार आहे, याविषयी माहिती देण्यात आली आहे.
नवीन अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन ही सर्वसामान्यांसाठी मोठी भेट ठरू शकते. सुरुवातीच्या टप्प्यात वंदे भारत साधारण म्हणून या ट्रेनला ओखळले जात होते. मात्र, यानंतर अमृत भारत असे नामकरण करण्यात आले. या ट्रेनमध्ये नॉन-एसी ते अनारक्षित तिकिटांचे डबे यांसह अनेक फायदे प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नवीन ट्रेनचे तंत्रज्ञान आणि डब्यांमधील सुविधांमध्ये बरेच बदल केले आहेत. सेमी-हायस्पीड अमृत भारत ट्रेनमध्ये अनेक नवीन प्रयोग करण्यात आले आल्याचे सांगितले जात आहे.
अमृत भारत ट्रेनमध्ये प्रवाशांना काय काय सुविधा मिळतील?
अमृत भारत ट्रेनचे तिकीट दर अन्य मेल/एक्स्प्रेस ट्रेनच्या तुलनेत १५ ते १७ टक्के जास्त असू शकतो, असा कयास आहे. ही ट्रेन ताशी १३० किमीचा वेग गाठू शकते. सुरुवातीला, दिल्लीहून अयोध्या मार्गे दरभंगा आणि बेंगळुरू ते मालदा या मार्गावर या ट्रेन चालवल्या जाणार आहेत. अमृत भारत ट्रेनला २२ डबे असतील. १२ द्वितीय श्रेणी आणि ८ सामान्य श्रेणीचे डबे असतील. याशिवाय गार्डचे दोन डबे असतील. रेल्वेने दिव्यांगांच्या सुविधांची विशेष काळजी घेतली आहे. यासाठी एक स्पेशल सोय करून देण्यात आली आहे. पुश-पुल तंत्रज्ञानावर काम करत असलेल्या या ट्रेनमध्ये दोन्ही बाजूला WAP5 प्रकारातील इंजिन असतील.
दरम्यान, अमृत भारत ट्रेनमध्ये लगेज रॅक किंवा रॅकवरही कुशन बसवले आहेत. सामान्य ट्रेनच्या तुलनेत आसने आरामदायी आणि आकर्षक बनवण्यात आली आहेत. विशेष बाब म्हणजे अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये मेट्रोचे सीलबंद गँगवे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. त्यामुळे प्रवासी एका डब्यातून दुसऱ्या डब्यात सहज जाऊ शकतात. या ट्रेनमधील प्रत्येक सीटजवळ चार्जिंग पॉइंट देण्यात आले आहेत. प्रवाशांना बॉटल होल्डर मिळेल, जो सहज फोल्ड करता येऊ शकेल. वंदे भारत एक्स्प्रेसप्रमाणेच अमृत भारत ट्रेनमध्ये झिरो डिस्चार्ज मॉड्यूलर टॉयलेट्स असतील.