दोन राज्यांत सत्ताधाऱ्यांमध्ये मतभेद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 05:22 AM2018-06-29T05:22:43+5:302018-06-29T05:22:53+5:30
पुढील वर्षी होणा-या लोकसभा निवडणुकांकरिता राज्यामध्ये सत्ताधारी, विरोधी पक्षांच्या गोटात त्यांच्या त्यांच्या मित्रपक्षांबरोबर जागावाटपाची बोलणी अद्याप सुरूही झालेली नसतानाच या सर्वच पक्षांतील मतभेद मात्र उफाळून आले
कर्नाटक : सिद्धरामय्यांबद्दल काँग्रेसश्रेष्ठींमध्ये नाराजी
धर्मस्थळ/बंगळुरू : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विद्यमान मुख्यमंत्री व आघाडीसरकारबद्दल वादग्रस्त वक्तव्ये केल्याने काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे. त्यांनी काही आमदार व मंत्र्यांची बैठकही घेतल्याने काँग्रेस श्रेष्ठींची अडचण झाली आहे. त्यांची ही कृती म्हणजे शक्तिप्रदर्शन मानले जात आहे.
कर्नाटकातील काँग्रेसचे आठ आमदार व दोन मंत्र्यांची सिद्धरामय्या यांनी धर्मस्थळ येथे बुधवारी एक बैठक घेतली. सिद्धरामय्या सध्या येथे निसर्गोपचारासाठी आले आहेत. या बैठकीचा व्हिडिओ प्रसारमाध्यमांत झळकला. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या सरकारबाबत वादग्रस्त वक्तव्ये केल्याबद्दल सिद्धरामय्या यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करणार का, या प्रश्नावर लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सूचक मौन पाळले. ही वक्तव्ये कोणत्या संदर्भात केली, हे त्यांना भेटून विचारणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
मात्र हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असे उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांनी म्हटले आहे. कोण काय बोलत आहे याला विशेष महत्त्व देण्याचे कारण नाही असा टोला त्यांनी सिद्धरामय्या यांचे नाव न घेता लगावला. जर्खिहोली या मंत्र्याने मंगळुरुमध्ये सांगितले की, सिद्धरामय्या यांना भेटण्यामागे कोणताही राजकीय हेतू नव्हता. सिद्धरामय्या बुधवारी दलित, मागासवर्गीय, अल्पसंख्याक समाजातील आमदारांना भेटले.
दुर्लक्ष करता येणार नाही
सिद्धरामय्या यांना भेटलेल्या आमदारांपैकी बी. नारायणराव यांनी सांगितले की, सिद्धरामय्या यांच्या स्थितीवरच राज्याचे व आघाडी सरकारचे कल्याण अवलंबून आहे. सिद्धरामय्यांकडे दुर्लक्ष केल्यास कोणालाही आपले अस्तित्व टिकविता येणार नाही. ते जनतेचे नेते असून त्यांना कोणीही कोपºयात ढकलू शकत नाही.
बिहार : जागावाटपाच्या चर्चेआधीच तणातणी सुरू
पाटणा : पुढील वर्षी होणा-या लोकसभा निवडणुकांकरिता राज्यामध्ये सत्ताधारी, विरोधी पक्षांच्या गोटात त्यांच्या त्यांच्या मित्रपक्षांबरोबर जागावाटपाची बोलणी अद्याप सुरूही झालेली नसतानाच या सर्वच पक्षांतील मतभेद मात्र उफाळून आले आहेत. भाजपाला निवडणुकांत युती करायची नसेल तर ते बिहारमधील ४० लोकसभा जागांवर आपले उमेदवार उभे करू शकतात, असे नितीशकुमारांचे निकटवर्तीय संजय सिंग यांनी म्हटले आहे.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे १२ जुलै रोजी बिहारच्या दौºयावर येत आहेत. राज्यातील भाजपा नेते, कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करण्याबरोबरच ते नितीशकुमार व राष्ट्रीय लोक समता पार्टीच नेते उपेंद्र कुशवाह यांचीही भेट घेतील. जातीय हिंसाचाराच्या विरोधात नितीशकुमार यांनी दोन दिवसांपूर्वी जोरदार भाषण केले होते. त्यांचा रोख भाजपावरच होता असे म्हटले जाते. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत नितीशकुमार असताना जनता दल (युनायटेड)ने १५ व भाजपाने २५ जागा लढविल्या होत्या. २०१४ साली रालोआतून नितीशकुमार बाहेर पडल्यानंतर बिहारमध्ये भाजपाने ३० लोकसभेच्या जागा लढवून २२वर विजय मिळविला होता. रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्तीने सहा, आरएलएसपीचे तीन जागा जिंकल्या होत्या. लोकसभेच्या जागावाटपाच्या चर्चेआधी नितीशकुमार व भाजपा दोघेही एकमेकांविरुद्ध दंड थोपटून परस्परांची ताकद आजमावत आहेत असे निरीक्षकांचे मत आहे. महाआघाडीमध्ये जनता दल युनायटेडने सामील व्हावे म्हणून त्या पक्षाबरोबर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कौतुब काद्री बैठका घेत आहेत. मात्र याचा काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने इन्कार केला आहे. राहुल गांधी यांच्याबरोबर ८ जून रोजी झालेल्या बैठकीला राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव उपस्थित होते. (वृत्तसंस्था)