सपातील मतभेद शिगेला
By admin | Published: September 16, 2016 01:21 AM2016-09-16T01:21:44+5:302016-09-16T01:21:44+5:30
समाजवादी पार्टीत निर्माण झालेले मतभेद गुरुवारी अधिक तीव्र झाले. आपले काका शिवपाल यादव यांच्यासोबत ‘गृहयुद्ध’ पुकारणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव
लखनौ : समाजवादी पार्टीत निर्माण झालेले मतभेद गुरुवारी अधिक तीव्र झाले. आपले काका शिवपाल यादव यांच्यासोबत ‘गृहयुद्ध’ पुकारणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना मुलायमसिंग यादव यांचे चुलत भाऊ रामगोपाल यांचे समर्थन मिळाले तर पक्षाच्या अन्य नेत्यांनी पक्षात निर्माण झालेल्या ताज्या संकटासाठी ‘बाहेरचे’ अमरसिंग यांनाच जबाबदार धरले.
पक्षाध्यक्ष मुलायमसिंग यादव हे गुरुवारी तडकाफडकी दिल्लीतून लखनौला परतले. ते पुत्र अखिलेश आणि इतर नेत्यांसोबत चर्चा करून झालेले नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करणार आहेत. इकडे पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस राम गोपाल यादव यांनी अखिलेश यांची भेट घेतली. ‘अखिलेश यांना उत्तर प्रदेश सपा अध्यक्षपदावरून हटविणे ही पक्ष नेतृत्वाने अनवधानाने केलेली चूक होती,’ अशी कबुली राम गोपाल यांनी दिली. त्यांनी राज्यसभेचे खासदार अमरसिंग यांच्यावरही जोरदार टीका केली.
मुलायमसिंग यादव यांनी अखिलेश यादव यांना प्रदेशाध्यक्षपदारून अचानक हटवून त्यांच्या जागी शिवपाल यादव यांची नियुक्ती केली होती. शिवपाल यांच्या नियुक्तीला काही तास लोटत नाही तोच अखिलेश यादव यांनी शिवपाल यादव यांच्याकडील सर्व महत्त्वाची खाती काढून घेतली आणि सपात संघर्ष पेटला.
कौटुंबिक वादात बाहेरच्यांनी भूमिका बजावली आहे, असे विधान अखिलेश यांनी केले होते. त्याबाबत विचारले असता राम गोपाल यादव म्हणाले, ‘बाहेरून आलेले काही नेते हस्तक्षेत करीत असल्याचे सर्वांचेच मत आहे.’ कॅबिनेट मंत्री आजम खान यांनीही अमरसिंग यांच्यावर अप्रत्यक्षपणे तोफ डागली. ते म्हणाले, मुख्यमंत्री सांगतात मग ते बरोबरच असणार. ही भीती आमच्याही मनात होतीच. त्यामुळेच असा काळा इतिहास असलेल्या लोकांना पुक्षात पुन्हा प्रवेश देण्याला आमचा विरोध होता. त्यांचे काम केवळ रेकॉर्डिंग आणि ब्लॅकमेल करणे एवढेच आहे.’
पक्षाचे राज्यसभेतील खासदार नरेश अग्रवाल म्हणाले, ‘जर एखादा बाहेरचा माणूस असेल आणि तो हस्तक्षेप करीत असेल तर त्याला वेळीच आवरले पाहिजे.’
‘पक्षाशी काही देणेघेणे नाही असे लोक मुलायमसिंग यांच्या साधेपणाचा फायदा घेत आहेत. ते पक्षाचे नुकसान करीत आहेत,’ असा आरोप रामगोपाल यांनी केला. तथापि शिवपाल यांनी अमरसिंग यांची पाठराखण केली.
ते म्हणाले, ‘सर्वांना सामावून घेऊनच पक्ष बळकट बनतो. पक्षात अनेक प्रकारचे लोक आहेत. मी २०११ मध्ये प्रदेशाध्यक्ष होतो. आता नेताजींनीच मला पुन्हा प्रदेशाध्यक्ष बनविले. त्यांचा आदेश कुणीही झुगारू शकत नाही.’
सपातमध्ये सुरू असलेला वाद निव्वळ ‘ड्रामेबाजी’ आहे. त्यात सत्य असेल तर सपाप्रमुख मुलायमसिंग यादव यांनी पुत्रमोह त्यागून जनहितार्थ सक्रिय राजकारणातून संन्यास घेतला पाहिजे, असे मत बसपा अध्यक्ष मायावती यांनी व्यक्त केले आहे.
त्या म्हणाल्या, सपा परिवारातील अनेक लोक राजकारणात सामील आहेत आणि त्या प्रत्येकाचा आपापला स्वार्थ आहे. अशावेळी पक्षांतर्गत मतभेदाची चर्चा ही निवडणुकीच्या तोंडावर जनतेचे लक्ष अन्यत्र वळविण्याच्या प्रयत्नाचाच एक भाग आहे. ही निव्वळ ड्रामेबाजी आहे.