सलाम! प्रबळ इच्छाशक्तीनं अपंगत्वावर मात; झोमॅटोच्या डिलेव्हरी बॉयवर कौतुकाचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 07:47 PM2019-05-20T19:47:19+5:302019-05-20T19:48:28+5:30
दिव्यांग तरुणाचा व्हिडीओ व्हायरल
मुंबई: अॅप्समुळे खाद्यपदार्थ ऑर्डर करणं अगदी सोपं झालं आहे. मोबाईलवरुन खाद्यपदार्थ मागवताच अवघ्या काही मिनिटांमध्ये ते घरपोच मिळतात. त्यामुळे अनेकांसाठी हे फायदेशीर ठरतं. यामध्ये घरपर्यंत खाद्यपदार्थ पोहोचवणारे डिलेव्हरी एक्झिक्वुटिव्ह्स महत्त्वाची भूमिका बजावतात. वाहतूक कोंडीतून वाट काढत डिलेव्हरी एक्झिक्वुटिव्ह्स खाद्यपदार्थ अगदी ग्राहकाच्या दरवाज्यापर्यंत पोहोचवतात.
गेल्या वर्षी झोमॅटोच्या एका डिलेव्हरी एक्झिक्वुटिव्हचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये झोमॅटोचा डिलेव्हरी एक्झिक्वुटिव्ह ग्राहकापर्यंत पोहोचवायचा खाद्यपदार्थ खाताना दिसत होता. यावरुन झोमॅटोवर टीकेची झोड उठली. सोशल मीडियानं झोमॅटोचा जोरदार समाचार घेतला. यानंतर झोमॅटोच्या एका डिलेव्हरी बॉयची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली. कॉमर्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करुनही डिलेव्हरी बॉयचं काम करावं लागत असल्याबद्दल अनेकांनी दु:ख व्यक्त केलं होतं.
#Zomato you keep rocking , you made my day , this man is the inspiration for all who thinks there's life is screwed , please make this man famous pic.twitter.com/DTLZKzCFoi
— Honey Goyal (@tfortitto) May 17, 2019
यानंतर आता झोमॅटो पुन्हा एकदा डिलेव्हरी एक्झिक्वुटिव्हमुळे चर्चेत आला आहे. या डिलेव्हरी बॉयनं अनेकांना प्रेरणा दिली आहे. या डिलेव्हरी बॉयचं नाव रामू आहे. दिव्यांग असलेला रामू तीन पायांची सायकल घेऊन खाद्यपदार्थ ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचतो. हनी गोयल नावाच्या एका ट्विटर यूजरनं रामूचा व्हिडीओ शेअर केला. तीन पायांची सायकल चालवत ग्राहकांच्या दारात पोहोचणारा रामू या व्हिडीओत दिसत आहे. गोयल यांच्या ट्विटनंतर अनेकांनी रामू यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. यानंतर झोमॅटोनं सर्वांचे आभार मानले. 'हा व्हिडीओ शेअर केल्याबद्दल आभार. आम्हाला आमच्या डिलेव्हरी पार्टनरचा अभिमान आहे. अनेक अडचणींवर मात करत ते ग्राहकांपर्यंत खाद्यपदार्थ पोहोचवतात,' अशा शब्दांमध्ये झोमॅटोनं रामू यांचं कौतुक केलं.