पृथ्वीवरून लँडरच्या स्थितीचा अंदाज लावण्यात अडचण; चंद्रयानासाठी पुढचा टप्पा अत्यंत कठीण : इस्रो
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 07:38 AM2023-08-08T07:38:41+5:302023-08-08T07:39:12+5:30
चंद्रयान-२ मोहिमेचा होतोय फायदा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : चंद्रयान-२ मोहिमेचा चंद्रयान-३ मोहिमेसाठी मोठा फायदा होत आहे. सध्याची भारताची तिसरी चंद्रयान-३ मोहीम अत्यंत उत्तम स्थितीत चंद्राच्या मार्गावर जात आहे. जेव्हा चंद्रयान १०० किलोमीटरच्या वर्तुळाकार कक्षेतून चंद्राजवळ जाण्यास सुरुवात करेल तेव्हा चंद्रयानासाठी त्याचा सर्वांत कठीण टप्पा असेल, असे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी सोमवारी सांगितले.
चंद्रयान-३ हे १४ जुलै रोजी प्रक्षेपित करण्यात आले आहे. ते सध्या ताशी १७० किमी वेगाने पुढे जात आहे. यान चंद्राच्या आणखी जवळ जाण्याची पुढील प्रक्रिया ९ ऑगस्ट रोजी केली जाईल. १७ ऑगस्टपर्यंत असे दोन प्रयत्न केले जातील.
यादरम्यान यान चंद्रापासून १०० किमी अंतरावर आणले जाईल. यानंतर चंद्रयान ३ चंद्राच्या पृष्ठभागावर २३ ऑगस्ट रोजी उतरविले जाईल, असे त्यांनी सांगितले.
अडचण कुठे येतेय?
n आकस्मिक संकटाला सामारे जाण्यासाठी आम्ही अधिक माहिती गोळा केली होती.
n यान १०० किलोमीटरवर पोहोचण्यासाठी आम्हाला कोणतीही अडचण दिसत नाही. केवळ पृथ्वीवरून लँडरच्या स्थितीचा अचूक अंदाज लावण्यात अडचण येत आहे.
n हे मोजमाप अतिशय कठीण आहे, त्याला कक्षा निश्चित करण्याची प्रक्रिया म्हणतो. जर ती बरोबर असेल, तर बाकीची प्रक्रिया करता येईल, असे एस सोमनाथ यांनी सांगितले.
चंद्रयान चंद्रावर उतरविण्यासाठी आम्ही यावेळी सक्षम आहोत. कक्षा बदल नियोजित प्रमाणे होत आहेत. यात कोणतेही विचलन नाही. त्यामुळे चंद्रयान मोहिमेबद्दल कोणतीही शंका नाही. चंद्रयान-२ च्या मोहिमेचा अनुभव आम्हाला येथे फायदेशीर ठरतो आहे.
- एस. सोमनाथ, अध्यक्ष, इस्रो