देशातील पहिला डिजिटल भिकारी राजूचे Heart Attack ने निधन, QR कोडद्वारे मागायचा भीक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 02:36 PM2024-05-10T14:36:36+5:302024-05-10T14:37:46+5:30
मानसिक अपंगत्वामुळे कोणीनी नोकरी दिली नाही, त्यामुळे भीक मागणे सुरू केले.
Digital Beggar Raju Died:बिहारच्या बेतिया (Bettiah) रेल्वे स्टेशनवर ऑनलाइन QR कोडद्वारे भीक मागून आपला उदरनिर्वाह करणारा डिजिटलभिकारी राजूचा स्टेशनवरच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. राजू स्वतःला देशातील पहिला डिजिटल म्हणायचा. डिजिटल इंडियाचा एक भाग असल्याचा त्याला खुप अभिमान होता. बेतिया शहरातील लोकांमध्ये राजू खुप लोकप्रिय होता. त्याच्या गळ्यात नेहमी एक QR कोड लटकलेला असायचा. विशेष म्हणजे तो स्वतःजवळ एक टॅबही बाळगायचा.
हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून राजू आजारी होता. त्याच्यावर बेतियातील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू होता. यादरम्यान त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू झाला. राजू रेल्वे स्टेशनवर सर्वांशी अतिशय हसून खेळून बोलायचा. तो कोणालाही त्रास द्यायचा नाही. जे लोक राजूला अनेकदा आर्थिक मदत करायचे किंवा ओळखायचे, त्यांना राजूच्या अकाली निधनाने धक्का बसला आहे.
पीएम मोदींपासून घेतली प्रेरणा
डिजिटल भिकारी राजूची ओळख म्हणजे त्याच्या गळ्यातील QR कोड आणि हातातील टॅब. पंतप्रधान मोदींच्या डिजिटल इंडियाच्या आवाहनानंतर राजूने ऑनलाइन भीक मागणे सुरू केले होते. बेतिया रेल्वे स्टेशन आणि बस स्टँड परिसरात QR कोडद्वारे भीक मागणारा राजू लालू प्रसाद यादव यांचाही मोठा चाहता होता. राजू स्वतःला लालू यादव यांचा मुलगा म्हणायचा. लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना राजूला दिवसातून दोनवेळा रेल्वेच्या कॅन्टीनमधून जेवण मिळायचे.
यामुळे भीक मागणे सुरू केले
मानसिक अपंगत्वामुळे राजूला कोणीनी नोकरी दिली नाही, त्यामुळे राजूने भीक मागणे सुरू केले. भीक मागून तो आपला उदरनिर्वाह करू लागला. दरम्यान, राजूच्या मृत्यूनंतर त्याचे अखेरचे दर्शन घेण्यसाठी रुग्णालयात मोठी गर्दी झाली.