डिजिटल इंडियाने बदलेल भविष्य!
By admin | Published: November 14, 2016 01:33 AM2016-11-14T01:33:33+5:302016-11-14T01:33:33+5:30
आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे देशाचे भाग्य बदलण्याची क्षमता डिजिटल इंडिया उपक्रमात आहे. हा सर्वसमावेशक उपक्रम श्रीमंतांपुरता मर्यादित नसून, गरीब माणसाला डोळ्यासमोर ठेवून आखला आहे.
सुरेश भटेवरा / नवी दिल्ली
आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे देशाचे भाग्य बदलण्याची क्षमता डिजिटल इंडिया उपक्रमात आहे. हा सर्वसमावेशक उपक्रम श्रीमंतांपुरता मर्यादित नसून, गरीब माणसाला डोळ्यासमोर ठेवून आखला आहे. नऊ स्तंभावर उभ्या असलेल्या या उपक्रमात विविध सेवांचा अंतर्भाव आहे. त्याचे सारथ्य भारताची गुणवत्ता (इंडियन टॅलंट= आयटी)+ माहिती तंत्रज्ञान (इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी = आयटी)+भविष्यातला भारत (इंडिया टुमारो = आयटी) हे तीन आयटी करीत आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी केले. अर्थविषयक संपादकांच्या परिषदेत तेबोलत होते.
डिजिटल इंडिया ज्या ९ स्तंभावर उभा आहे, त्यात ब्रॉडबँड हायवे, युनिव्हर्सल अॅक्सेस मोबाईल कनेक्टिव्हिटी, सार्वजनिक इंटरनेट सेवा, ई-शासन, तंत्रज्ञान आधातित सरकारी सुधारणा, ई क्रांतीद्वारे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सेवा, सर्वांसाठी माहिती, शून्य आयातीच्या लक्ष्यासह इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या उत्पादनात वृद्धी, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात रोजगारवाढ व आधुनिक तंत्रज्ञानाने शेतीला पूरक अद्ययावत माहिती पुरवणे या कार्यक्रमांचा समावेश आहे.
मायगव्ह हे भारत सरकारचे ई-शासनासाठी नागरिक भागीदारीचे व्यासपीठ आहे. राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात सर्वसामान्य लोक या प्लॅटफॉर्मवर सूचना कळवू शकतात. त्यावर ३७ लाखांहून अधिक लोकांनी आपली नोंदणी केली आहे. शोध व संशोधनासाठी ओपन गव्हर्नमेंट डेटा प्लॅटफॉर्म (ओजीडी)आहे. त्यात विविध प्रकारचे डेटाबेस अॅक्सेस करता येतात. जीवन प्रमाण ही देशातल्या पेन्शनर्ससाठी लाईफ सर्टिफिकेट देणारी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक डिजिटल व्यवस्था आहे. मौल्यवान दस्तऐवज सुरक्षित ठेवण्यासाठी डिजिटल लॉकर्स सुविधा आहे. त्याचा लाभ २७ लाख लोकांनी घेतला असून ३२.२४ लाख दस्तऐवज सुरक्षितपणे त्यावर अपलोड झाले आहेत, असे ते म्हणाले.