दिग्विजय यांनी ओळखली मोदी सरकारची 'खेळी'; पेट्रोल दराबाबत वर्तवलं भाकित
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2018 10:42 AM2018-05-22T10:42:22+5:302018-05-22T10:42:22+5:30
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. दिग्विजय सिंह 6 महिन्यांच्या नर्मदा परिक्रमेवरून परतल्यानंतर त्यांनी पेट्रोल-डिझेलच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे.
भोपाळ- मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. दिग्विजय सिंह 6 महिन्यांच्या नर्मदा परिक्रमेवरून परतल्यानंतर त्यांनी पेट्रोल-डिझेलच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. ट्विट करत ते म्हणाले, देशभरात पेट्रोल-डिझेलची भाव भडकले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसमवेत देशभरात भाजपाचं राज्य असेलली सरकारे बॅकफूटवर गेली आहेत.
2014 ते 2018 दरम्यान मोदी सरकारनं मोठ्या प्रमाणात एक्साइज ड्युटी वाढवली आहे. त्यामुळे मोदी सरकार 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या दोन महिन्यांपूर्वी पेट्रोलवरची एक्साइज ड्युटी 18.28 रुपयांनी, तर डिझेलवरची एक्साइज ड्युटी 19.87 रुपये कमी करून मतदारांना आकर्षित करू शकते. तसेच पायाभूत सुविधांच्या विकासाच्या नावाखाली 8 रुपये प्रतिलिटर सेस वेगळा लावण्यात येत आहे, असंही दिग्विजय सिंह म्हणाले आहेत.
Least GOI and Modiji can do is to reduce Central Excise Duty to the level of May 2014 which would bring the price of Petrol by Rs 18.28/ litre and Diesel by Rs 19.87/litre. They won't do it today but probably they would do it in February 2019 2 months before LS polls.
— digvijaya singh (@digvijaya_28) May 21, 2018
गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. विशेष म्हणजे त्यावेळी दिग्विजय सिंह यांनी जो फोटो शेअर केला आहे, त्यामध्ये शिवी लिहिण्यात आली होती.
दिग्विजय सिंह यांनी पक्षाला अडचणीत आणण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केल्याने ते अडचणीत आले आहेत. मागील काही दिवसांपूर्वी दिग्विजय सिंह यांनी पाकिस्तानव्याप्त काश्मीरचा उल्लेख भारतव्याप्त काश्मीर असा केला होता. 8 जुलै रोजी दहशतवादी बु-हान वानीला सुरक्षा जवानांनी ठार केल्याने आधीच काश्मीर खो-यात वातावरण तापलं असताना दिग्विजय सिंह यांनी हे वक्तव्य केलं होतं.
2013मध्ये आपल्याच पक्षाच्या महिला खासदारा मीनाक्षी नटराजन यांचे वर्णन '१०० टंच माल' असे वर्ण केल्याने दिग्विजय सिंह यांच्यावर टीका झाली होती. काँग्रेसच्या खासदार मीनाक्षी नटराजन यांच्या मंदसौर मतदारसंघात झालेल्या जाहीर सभेत दिग्विजय सिंह बोलत होते. आपल्याला खरं सोनं असं म्हणायचं होतं अशी सारवासावर त्यांनी केली होती. तसंच चुकीचं वार्तांकन करणा-या टीव्ही चॅनेल्सविरोधात कारवाईची धमकी दिली होती.