गोव्यातील नाकर्तेपण दिग्विजय सिंहना भोवले
By admin | Published: April 30, 2017 05:30 AM2017-04-30T05:30:09+5:302017-04-30T05:30:09+5:30
सर्वाधिक आमदार निवडून येऊनही गोव्यात सत्ता स्थापन करण्यात अपयश आल्यानंतर काँग्रेसने आता पक्षाचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांच्याकडून
- शीलेश शर्मा, नवी दिल्ली
सर्वाधिक आमदार निवडून येऊनही गोव्यात सत्ता स्थापन करण्यात अपयश आल्यानंतर काँग्रेसने आता पक्षाचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांच्याकडून गोवा आणि कर्नाटक या दोन राज्यांचे प्रभारीपद काढून घेतले आहे.
पक्षाने गोव्याची जबाबदारी चेल्ला कुमार, तर कर्नाटकची जबाबदारी के.सी. वेणुगोपाल यांच्याकडे दिली आहे.
गोव्यात सरकार स्थापन करण्यात अपयश आले होते. त्याला दिग्विजय सिंह हेच जबाबदार असल्याचा आरोप गोवा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर सिंह यांना दूर करण्यात आले आहे. कर्नाटकात २0१८ मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे.
सर्व सरचिटणीस अडचणीत
काँग्रेसने गुरुदास कामत यांच्यानंतर आता मधुसूदन मिस्त्री यांनाही सरचिटणीस पदावरून मुक्त केले आहे. सी. पी. जोशी आणि मोहन प्रकाश यांना पदमुक्त केले जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. सर्व सरचिटणीसांना दूर करून कमी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात. गुरुदास कामत यांच्याकडे अजूनही राजस्थानचा कार्यभार आहे. तोही लवकरच अन्य नेत्याकडे दिला जाऊ शकतो, असे पक्ष सूत्रांनी सांगितले.