दिग्विजय सिंहांनी वाघेलांना दिला जातीचा दाखला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2017 12:27 PM2017-08-08T12:27:54+5:302017-08-08T12:30:26+5:30
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंहांनी राज्यसभेतील खासदारकीसाठी होणाऱ्या निवडणुकीमध्ये शंकर सिंह वाघेलांनी आपल्या जीताच विचार करून अहमद पटेलांना मत द्यावं असं आवाहन केलं आहे
नवी दिल्ली, दि. 8 - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंहांनी राज्यसभेतील खासदारकीसाठी होणाऱ्या निवडणुकीमध्ये शंकर सिंह वाघेलांनी आपल्या जीताच विचार करून अहमद पटेलांना मत द्यावं असं आवाहन केलं आहे. शंकर सिंह वाघेला तुम्ही राजपूत आहात, काँग्रेसनं तुमच्यासाठी काय केलंय ते विसरू नका आणि अहमदभाईंना विजयी करा असं आवाहन त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलं आहे. अहमदभाई हे आपले मित्र आणि पाठिराखे असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. तुमचे काँग्रेससोबत जे काही मतभेद आहेत, ते आपण सोडवू असेही दिग्विजय सिंहांनी वाघेलांना सांगितले आहे.
Don't forget what Congress has done for you. You are a Rajput. Please ensure Ahmed Bhai's victory. He has been our friend and supporter.
— digvijaya singh (@digvijaya_28) August 8, 2017
विशेष म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांमध्ये तसेच निवडणूक आयोगानं घालून दिलेल्या आचार संहितेमध्ये मतदान करण्यासाठी जातीचा दाखला देऊ नये असे स्पष्ट निर्देश आहेत. त्यामुळे दिग्विजय सिंहांनी न्यायालयाच्या आदेशाचा तसेच निवडणूक आयोगाच्या आचार संहितेचा भंग केला असल्याचं सांगण्यात येत आहे.
जानेवारीमध्ये एका प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिले होते की, धर्म, जात अथवा पंथाच्या आधारे राजकारण्यांना मते मागता येणार नाहीत. जर असा प्रकार घडला तर ही भ्रष्ट पद्धत समजण्यात येईल आणि त्यासाठी संबंधित उमेदवाराला अपात्र ठरवण्याची शक्यताही आहे. रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स अॅक्टमधल्या 123 सेक्शनमध्ये या संदर्भात तरतूद करण्यात आली असून त्यामध्ये केवळ धर्माचा उल्लेख होता, जो विस्तारत सर्वोच्च न्यायालयाने जात व पंथांनाही या कक्षेत या आदेशाद्वारे आणले आहे.
तर, निवडणूक आयोगाच्या आचार संहितेनुसार मतं मिळवण्यासाठी जात, सामाजिक पार्श्वभूमी आदींचा वापर करतायेणार नाही. अर्थात, मतदान झाल्यानंतर वाघेलांनी आपण अहमद पटेलांना मत दिले नसल्याचे सांगितले आहे.