दिग्विजय सिंहांची गोवा, कर्नाटकच्या प्रभारीपदावरून उचलबांगडी
By admin | Published: April 29, 2017 09:43 PM2017-04-29T21:43:51+5:302017-04-29T22:10:58+5:30
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांना गोवा आणि कर्नाटकमधील पक्षाच्या प्रभारीपदावर काढण्यात आले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांना गोवा आणि कर्नाटकमधील पक्षाच्या प्रभारीपदावर काढण्यात आले आहे. त्यांच्याऐवजी आता ए. चेल्लकुमार हे गोव्याचे प्रभारी तर कर्नाटकच्या प्रभारीपदी के. सी. वेणुगोपाल यांची नियुक्त करण्यात आली आहे.
गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पार्टीला सर्वाधिक जागा मिळालेल्या असतानाही तेथे सत्ता स्थापन करण्यात काँग्रेसला यश आले नाही. या पार्श्वभूमीवर दिग्विजय सिंह यांची उचलबांगडी झाल्याचे बोलले जात आहे.
गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळालेल्या असतानाही सत्ता स्थापन करू न शकल्याने काँग्रेसवर अनेकांनी उपहासात्मक टीका केली. यावर भाजपानं काँग्रेसच्या जखमेवर मिठ चोळत म्हटले होते की, "दिग्विजय सिंह गोव्यात सुट्टी साजरी करत होते". शिवाय, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी भाषणादरम्यान दिग्विजय सिंहांचे आभार मानले होते. दिग्विजय सिंग यांनी काहीही न केल्याने गोव्यात भाजपलास सत्ता स्थापन करण्यात यश आलं, अशी उपहासात्मक टीका त्यांनी दिग्विजय सिंहांवर केली होती.
दरम्यान, कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन येथे नवीन राजकीय रणनीती आखून पक्षाचा प्रभारी बदलण्यात आल्याची चर्चा आहे.
काही दिवसांपूर्वी गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांनी पार्टीनं गोव्यामध्ये सत्तास्थापन न केल्याने दिग्विजय सिंह आणि के.सी. वेणुगोपाल यांच्यावर हल्लाबोल चढवला होता. 21 आमदार निवडून आलेले असतानाही दिग्विजय यांनी राज्यपालांकडे जाण्यापासून रोखले, असेही ते म्हणालेत.
दरम्यान, सत्तास्थापन करण्यासाठी राज्यपाल प्रस्ताव येण्याची प्रतीक्षा करायला हवी, असा सल्ला दिग्विजय यांनी त्यावेळी दिला. दिग्विजय यांच्या सांगण्यावरुन पार्टीनं थांबवण्याचा निर्णय घेतला.
कारण नियमाप्रमाणे राज्यपाल निवडणुकीतील निकालानुसार सर्वात मोठ्या पक्षाला सरकारस्थापनेचं निमंत्रण देतात. पण या सगळ्या कालावधीत भाजपाने लहान लहान पक्षांची मोट बांधत बहुमताचा आकडा गाठला व सरकार स्थापन केले. दरम्यान घडल्या प्रकाराबाबत दिग्विजय सिंह यांनी गोव्याच्या जनतेची माफीही मागितली.