अम्मांच्या नावे दिनकरन यांचा पक्ष, राज्यात सत्तेवर येण्याचा केला दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 01:51 AM2018-03-16T01:51:02+5:302018-03-16T01:51:02+5:30
अण्णा द्रमुकमधून हकालपट्टी झालेले नेते टीटीव्ही दिनकरन यांनी गुरुवारी नव्या पक्षाची घोषणा केली. दिवंंगत जयललिता यांच्या नावावर ‘अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघम’ नावाचा पक्ष त्यांनी स्थापन केला.
मदुराई : अण्णा द्रमुकमधून हकालपट्टी झालेले नेते टीटीव्ही दिनकरन यांनी गुरुवारी नव्या पक्षाची घोषणा केली. दिवंंगत जयललिता यांच्या नावावर ‘अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघम’ नावाचा पक्ष त्यांनी स्थापन केला. आमचा पक्ष राज्यात लवकरच सत्तेवर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शहरातील अनेक मार्गांवर दिनकरन यांचे बॅनर आणि होर्डिंग्ज लागले होते. यात त्यांचा उल्लेख ‘भावी मुख्यमंत्री’असा करण्यात आला होता. आजच्या कार्यक्रमास माजी मंत्री व्ही. सेंदिल आणि पी. पलानीअप्पन, एस. अन्बळगन आदी वरिष्ठ नेते उपस्थित होते. याशिवाय, अपात्र ठरविण्यात आलेले आमदार आणि दिनकरन यांचे समर्थक उपस्थित होते. या बैठकीला आलेल्या नेत्यांनी मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्या सरकारवर टीका केली आणि या सरकारमध्ये विश्वासघातकी लोक असल्याचा आरोप केला.
दिनकरन यांना पक्षातील असंतुष्ट कार्यकर्ते आणि नेते यांचा पाठिंबा मिळताना दिसत आहे.
त्यांनी आपल्या नव्या पक्षाच्या झेंड्याचे आज अनावरण केले.
त्यावर जयललिता यांचे हसरे छायाचित्र आहे. मदुराईजवळील कार्यक्रमात बोलताना दिनकरन म्हणाले की, नाव नसल्याने संघटनात्मक कार्य वाढविण्यास पक्ष कार्यकर्त्यांना अडचण येत होती. त्यामुळे आपण दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागितली. त्यानंतर आम्हाला प्रेशर कूकर हे चिन्ह वाटप करावे, असे निर्देश न्यायालयाने दिले. त्यामुळे पक्षाचा विस्तार आता शक्य होणार आहे. (वृत्तसंस्था)
>तामिळनाडूमध्ये वाढत चालले पक्ष
राज्यात आतापर्यंत द्रमुक, अण्णा द्रमुक, काँग्रेस, भाजपा हे प्रमुख पक्ष होते. याशिवाय रामदास यांचा पीएमके, वायको यांचा एमडीएमके हे पक्षही सक्रिय आहेत. दोन्ही डाव्या पक्षांची काही ठिकाणी ताकद आहे. कमल हासन व रजनीकांत हेही आता राजकारणात सक्रिय झाले आहे. दिनकरन यांनीही नवा पक्ष स्थापन केला. एकूणच तामिळनाडूमध्ये पक्षांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. सध्या तुरुंगात असलेल्या शशिकला यांचे दिनकरन हे भाचे आहेत. डिसेंबर महिन्यात झालेल्या चेन्नईतील आरके नगर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते.