दिल और दिमाग में गिरावट आ गई है, सुधरना चाहिए; ‘जवाहर’च्या हिंदी अनुवादाचे प्रकाशन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 08:36 AM2023-12-05T08:36:19+5:302023-12-05T08:36:30+5:30
राजकारण-पत्रकारितेतल्या मान्यवरांची उपस्थिती
नवी दिल्ली : स्वातंत्र्यानंतर देशाची प्रगती झाली, विकासाचा रस्ता प्रशस्त होत गेला पण त्या भरात ‘जीवनमूल्यांचे ऱ्हासपर्व’ही देशाने अनुभवले. तीव्र राजकीय विरोधातही संस्कृती आणि सभ्यता जपणाऱ्या नेतृत्वाची पिढी अस्तंगत होत गेली, याबद्दल हृदयीची खंत व्यक्त करणाऱ्या ज्येष्ठांच्या उपस्थितीत ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या ‘जवाहर’ या चरित्रग्रंथाच्या हिंदी आवृत्तीचे प्रकाशन दिल्लीत संपन्न झाले.
अनेक धर्म-परंपरांच्या, रंग-रूप-स्वभावाच्या माणसांना सुखाने एकत्र नांदवणाऱ्या या देशाला आपण धार्मिक आणि जातीय भेदभावाचे ‘रंग’ दिले आहेत; अशी सार्वत्रिक हळहळ व्यक्त करणाऱ्या सर्व प्रमुख वक्त्यांच्या भावनेला शब्दरूप देताना माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद म्हणाले, ‘दिल और दिमाग में गिरावट आ चुकी है, सुधरना चाहिए! ईश्वराने विविधतेचे रंग भरलेल्या या देशाचा व्यक्तिगत स्वार्थापोटी बेरंग होता कामा नये!’
जीवनात व्यक्ती किती दूर जाऊ शकते आणि काय साध्य करू शकते, याचे उदाहरण म्हणजे जवाहरलाल दर्डा होते. त्यांच्यासाठी आकाश ठेंगणे होते. ‘लोकमत’ देशात अव्वल क्रमांकाचा मीडिया समूह व्हावा, ही शुभेच्छा. - अधीर रंजन चौधरी
बाबूजींशी आपले १९७९ पासूनचे संबंध होते. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता, दुःख किंवा अशांतीचे भाव नसायचे. त्यांची मुखमुद्रा वनवासाच्या वृत्तीने दुःखी किंवा राज्याभिषेकाने हर्षभरित न होणाऱ्या श्रीरामासारखी भासायची.- जनार्दन द्विवेदी
यवतमाळसारख्या जिल्ह्यातून सुरुवात करणारे बाबूजी जवाहरलाल दर्डा हे भारताचे रुपर्ट मरडॉक आहेत. त्यांनी आपल्या पत्रकारितेचा कधीच राजकीय स्वार्थासाठी उपयोग केला नाही.- विनोद तावडे
आपले अस्तित्व आणि विचारांप्रमाणेच इतरांचे अस्तित्व आणि विचार स्वीकारून त्यांचा सन्मान करणे बाबूजींनी आचरणात आणले होते. वैचारिक प्रदूषण दूर करण्यासाठी युवा पिढीने बाबूजींवरील चरित्रग्रंथ वाचावा.- आचार्य लोकेश मुनिजी
आजच्या जमान्यातील पत्रकारांनी हिमतीने आणि निष्पक्षतेने पत्रकारिता करावी आणि जवाहरलाल दर्डा यांना आपला आदर्श मानावा. - आलोक मेहता
बाबूजी गरीब, दलित, वंचित, उपेक्षितांसह सर्व धर्माच्या लोकांशी मानवतेच्या नात्याने वागले. त्यांनी नामांतराला सक्रिय पाठिंबा दिला होता. - रामदास आठवले
जवाहरलाल दर्डा यांचा राजकीय आणि पत्रकारितेचा प्रवास तसेच त्यांच्यावरील चरित्रग्रंथ अतिशय प्रेरणादायी आहे. - सत्यपाल सिंह बघेल
सत्तेत असो वा नसाे, सिद्धांत सोडला नाही
याप्रसंगी गुलाम नबी आझाद यांनी बाबूजींसोबतच्या अनेक हृद्य आठवणी विशद केल्या. बाबूजींप्रमाणे धर्म आणि जातिभेद न मानणारी पिढी आता संपली आहे. विमानतळाहून त्यांच्या निवासस्थानी भोजनासाठी गेला नाही असा कोणताही नेता नसेल आणि त्यांनी आदर केला नाही, असा कोणता राजकीय पक्षही नसेल. काँग्रेस सत्तेत असो वा विरोधात, त्यांनी आपला सिद्धांत सोडला नाही, असे ते म्हणाले.