'दिल जीत लिया...', चौधरी चरणसिंह यांना भारतरत्न मिळाल्याबद्दल जयंत चौधरींचे ट्विट!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 01:42 PM2024-02-09T13:42:41+5:302024-02-09T13:54:07+5:30
चौधरी चरणसिंह यांच्यासह माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव आणि कृषी शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती दिली.
लखनौ : माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांना भारतरत्न देण्याच्या केंद्र सरकारच्या घोषणेवर आरएलडी प्रमुख जयंत चौधरी यांनी आनंद व्यक्त केला आहे. जयंत चौधरी यांनी ट्विट करून सरकारने मने जिंकल्याचे म्हटले आहे. 'दिल जीत लिया...' असे ट्विट जयंत चौधरी यांनी केले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांच्यासह माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव आणि कृषी शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती दिली.
चौधरी चरणसिंह यांच्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ''देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येत आहे, हे आपल्या सरकारचे भाग्य आहे. हा सन्मान त्यांनी देशासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाला समर्पित आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी समर्पित केले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असोत वा देशाचे गृहमंत्री आणि आमदार म्हणूनही त्यांनी राष्ट्र उभारणीला नेहमीच गती दिली. आणीबाणीच्या विरोधातही ते ठामपणे उभे राहिले. आमच्या शेतकरी बंधू-भगिनींप्रती असलेले त्यांचे समर्पण आणि आणीबाणीच्या काळात लोकशाहीप्रती असलेली त्यांची बांधिलकी संपूर्ण देशाला प्रेरणादायी आहे."
दिल जीत लिया! #BharatRatnahttps://t.co/Ns0CraJ7yI
— Jayant Singh (@jayantrld) February 9, 2024
दरम्यान, भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. एखाद्या क्षेत्रात असाधारण आणि सर्वोच्च कामगिरी केल्याबद्दल केंद्र सरकारकडून भारतरत्न पुरस्कार देण्यात येतो. राजकारण, कला, साहित्य, क्रीडा,विज्ञान क्षेत्रातील विचारवंत, शास्त्रज्ञ, उद्योगपती, लेखक आणि समाजसेवक यांना या पुरस्काराने गौरवण्यात येते. अलीकडेच बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनाही भारतरत्नने सन्मानित करण्यात आले आहे.
चौधरी चरणसिंह यांच्याविषयी...
चौधरी चरणसिंह (Chaudhary Charan Singh) यांचा जन्म 1902 मध्ये उत्तरप्रदेशच्या मेरठ जिल्ह्यातील नूरपूर येथे एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात झाला. ते सर्वप्रथम 1937 मध्ये छपरोली येथून उत्तरप्रदेश विधानसभेसाठी निवडले गेले. त्यांनंतर त्यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी काम केले. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. 1979 साली ते देशाची अर्थमंत्री आणि उपपंतप्रधान बनले. त्यावेळी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक म्हणजे नाबार्डची स्थापना केली. 28 जुलै 1979 रोजी चौधरी चरण सिंह समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने देशाचे पंतप्रधान बनले होते.