कारगिल युद्धात वाजपेयींनी घेतली होती दिलीप कुमारांची मदत
By admin | Published: September 7, 2015 06:21 PM2015-09-07T18:21:19+5:302015-09-07T18:21:19+5:30
कारगिल युद्ध सुरु झाल्यावर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांची मदत घेतल्याचे समोर आले आहे.
ऑनलाइन लोकमत
लाहोर, दि. ७ - कारगिल युद्ध सुरु झाल्यावर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांची मदत घेतल्याचे समोर आले आहे. युद्ध सुरु झाल्यावर वाजपेयींनी दिलीपकुमार व नवाझ शरीफ यांच्यात दुरध्वनीव्दारे चर्चा घडवली होती. यात दिलीपकुमार यांनी पाकिस्तानने परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन शरीफ यांना केले होते.
पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसूरी यांनी एक पुस्तक लिहीले असून या पुस्तकात कारगिल युद्धातील एका प्रसंगाचा उल्लेख करण्यात आला आहे. कारगिल युद्ध सुरु झाल्यावर अटलबिहारी वाजपेयींनी शरीफ यांना फोन केला. लाहोर दौ-यावर असताना शरीफ यांनी योग्य सन्मान दिला नाही अशी तक्रार वाजपेयींनी केली होती. एकीकडे लाहोरमध्ये वाजपेयींचे जल्लोषात स्वागत होत असताना दुसरीकड़े पाक सैन्य भारतीय हद्दीत घुसखोरी करत होते असे वाजपेयींनी शरीफ यांना सांगितले. यानंतर शरीफ यांनी या प्रकाराची आपल्याला काहीच माहिती नाही, लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांच्याशी चर्चा करुन तुमच्याशी पुन्हा चर्चा करतो असे शरीफ यांनी वाजपेयींना सांगितले. यानंतर वाजपेंयींनी एका व्यक्तीला तुमच्याशी बोलायचे आहे असे शरीफ यांना सांगितले. ही व्यक्ती म्हणजे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार होती. दिलीप कुमार यांनी शरीफ यांना परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन केले. भारत - पाकमधील संबंधामुळे भारतातील मुसलमान भयग्रस्त झाले आहेत. त्यांना घरातून बाहेर पडायलाही भीती वाटते. त्यामुळे तुम्हीच आता पुढाकार घ्यावा असे आवाहन दिलीप कुमार यांनी केले. 'तुम्ही भारत - पाकमधील शांतीपूर्ण संबंधांचे समर्थक आहात पण तुमच्याकडून आम्हाला अशी आशा नाही' असेही दिलीपकुमार यांनी शरीफ यांना सुनावले होते. पाकिस्तानने यापूर्वी दिलीप कुमार यांना सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानितही केले होते.