उत्तराखंडात सापडला डायनासोर सदृश्य प्राण्याचा सांगाडा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2017 02:01 PM2017-11-21T14:01:33+5:302017-11-21T14:02:55+5:30
नैनीतालपासून सुमारे 110 किमी अंतरावर असणाऱ्या जसपूर या छोट्याश्या शहरात असलेल्या विद्युत उपक्रेंद्रातील जुन्या खंडहरनुमा भवनात एक डायनासोर सदृश्य प्राण्याचा सांगाडा सापडला आहे.
जसपूर- नैनीतालपासून सुमारे 110 किमी अंतरावर असणाऱ्या जसपूर या छोट्याश्या शहरात असलेल्या विद्युत उपक्रेंद्रातील जुन्या खंडहरनुमा भवनात एक डायनासोर सदृश्य प्राण्याचा सांगाडा सापडला आहे. शहराच्या फैज-ए-आम मार्गावरील विद्युत उपकेंद्रावरील भवन 35 वर्ष जून आहे. त्या ठिकाणी बीलिंग काऊंटर बनविण्यासाठी रविवारी त्या भवनाची साफसफाई सुरू असताना विभागीय कर्मचाऱ्यांना हा सांगाडा आढळून आला.
ज्या भागात हा डायनासोर सदृश्य प्राण्याचा सांगाडा सापडला तो भाग राज्य महावितरणाच्या विभागात आहे. प्राण्याच्या सांगाड्याची लांबी दोन फूट तर उंची एक फूट असल्याचं सांगितलं जातं आहे. जसपूरमध्ये सापडलेला प्राण्याचा हा सांगाडा हुबेहूब डायनासोर सारखा दिसतो. पोलिसांनी हा सांगाडा ताब्यात घेतला असून पुढे वन अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारची शरीर रचना असलेले जीव उत्तराखंडाच्या जंगलात कधीही पाहिले गेलेले नाहीत.
काम करताना काही कामगारांना प्राण्याचा सांगाडा आढळून आल्यानंतर त्यांनी त्याची माहिती ठेवेदाराला दिली. ठेकेदाराने पोलिसांना याबद्दल सांगितलं असून आम्ही पुरातत्व विभागालाही याबद्दलची माहिती दिल्याचं, विद्युत विभागाचे अधिकारी बळी राम यांनी हिंदुस्तान टाइम्सला सांगितलं आहे.
बंद असलेल्या घरात काही प्राणी आले असतील आणि त्यांचा मृत्यू झाला असेल, अशी शक्यता वर्तविली जाते आहे. संबंधित विभागाला याबद्दलची तक्रार दिली असल्याचं, जसपूर पोलीस स्टेशनचे अधिकारी अब्दुल कलाम यांनी सांगितलं.
डायनासोरसारख्या दिसणाऱ्या प्राण्याची बोट जवळपास 29 सेमीची असून त्याची शेपूट 5 सेंमी आहे. या सांगाड्याला तपासणीसाठी डेहराडूनच्या वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
डायनासोरसारख्या प्राण्याचा सांगाडा सापडल्याची माहिती सगळीकडे पसरताच लोकांनी त्याला बघायला मोठी गर्दी केली. 'जसपूर भागात पालीसारखे दिसणारे प्राणी असू शकतात. म्हणून या प्राण्याच्या सांगाड्याला पाहून आम्ही थोडे गोंधळले आहोत. या प्राण्यांचा परिसरात शोध घेण्यासाठी प्रशासनाकडे मदत मागितली असल्याचं, एका स्थानिक नागरिकाने सांगितलं आहे.