प्रत्येक पाचव्या पदार्थात भेसळ
By admin | Published: July 21, 2015 10:28 PM2015-07-21T22:28:33+5:302015-07-21T22:28:33+5:30
पॅकेटबंद दूध, पाणी असो की मिठाई. प्रत्येक पाचव्या पदार्थात भेसळ आहे. डबाबंद खाद्यपदार्थ बनविणाऱ्या कंपन्यांनी मापदंडांचे उल्लंघन चालवले आहे
नवी दिल्ली : पॅकेटबंद दूध, पाणी असो की मिठाई. प्रत्येक पाचव्या पदार्थात भेसळ आहे. डबाबंद खाद्यपदार्थ बनविणाऱ्या कंपन्यांनी मापदंडांचे उल्लंघन चालवले आहे. गेल्यावर्षी खाद्यपदार्थांच्या तपासणीत प्रत्येक पाचवा नमुना भेसळयुक्त आढळला, ही वस्तुस्थिती केंद्रीय आरोग्यमंत्री जगतप्रकाश नड्डा यांनी राज्यसभेत खासदार विजय दर्डा यांच्या प्रश्नाला उत्तर देताना उघड केली.
२०१४-१५ या वर्षात देशभरातील डबाबंद खाद्यपदार्थांचे ६८,१९७ नमुने घेण्यात आले. त्यातील ६०,५४८ नमुन्यांच्या तपासणीत एकूण १२,०७७ नमुने भेसळयुक्त असल्याचे किंवा डब्यांवर योग्यप्रकारे माहिती नमूद केली नसल्याचे आढळून आले. भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाने
(एफएसएसएआय) सर्व राज्यांतील बाजारात विकले जात असलेले दूध, बाटलीबंद पाणी,मिठाई आणि खाद्य तेलांच्या भेसळीबाबत निगराणी ठेवण्याचा आदेश दिला काय, असा प्रश्न दर्डा यांनी विचारला होता. एफएसएसएआयकडून वेळोवेळी राज्यांच्या संबंधित प्राधिकरणांना अन्नपदार्थांच्या सुरक्षेसंबंधी बाबींची माहिती पुरविली जाते. या प्राधिकरणाच्या केंद्रीय सल्लागार समितीच्या (सीएसी) बैठकीत अशा मुद्यांवर चर्चा केली जाते. राज्यांच्या अन्न सुरक्षा आयुक्तांना या चर्चेत सहभागी करवून घेतले जाते, अशी माहिती नड्डा यांनी दिली.
(लोकमत न्यूज नेटवर्क)