कृषी तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम २ वर्षांचा
By admin | Published: July 10, 2015 09:26 PM2015-07-10T21:26:47+5:302015-07-10T21:26:47+5:30
एकनाथ खडसे यांची माहिती
Next
ए नाथ खडसे यांची माहितीपुणे : इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना येणारी अडचण लक्षात घेऊन कृषी तंत्रज्ञान हा ३ वर्षांचा पदविका अभ्यासक्रम २ वर्षांचा करण्याचे ४५ संस्थांचे प्रस्ताव मान्य करण्यात आले आहेत. त्यामुळे या संस्थांमध्ये आता संबंधित विद्यार्थ्यांना मराठी माध्यमातून शिक्षण घेता येणार आहे. पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर थेट बी.एस्सी. ॲग्रीकल्चरच्या द्वितीय वर्षात प्रवेश देण्याचेही ठरविण्यात आल्याचे राज्याचे कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी पत्रकारांना सांगितले.शेतकी शाळांमध्ये २ वर्षांचा शेती पदविका आणि कृषी तंत्रनिकेतनमध्ये तीन वर्षांचा कृषी तंत्रज्ञान हा पदविका अभ्यासक्रम आहे. दोन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम हा मराठी माध्यमातून शिकविण्यात येतो. मात्र, ३ वर्षांचा अभ्यासक्रम सेमी इंग्रजी माध्यमातून शिकविला जातो. ३ वर्षांचे अभ्यासक्रम २ वर्षांचे करून ते मराठी माध्यमातून शिकविण्याचे ४५ संस्थांचे प्रस्ताव मान्य झाले असल्याचे खडसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेची ९१ वी बैठक पुण्यात झाली. त्यानंतर ते बोलत होते.पावसाने ओढ दिल्याने शेतक-यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. येत्या आठ दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास दुबार पेरण्यांसाठी बियाणांसाठी अनुदान दिले जाणार आहे. मात्र, किती ठिकाणी दुबार पेरणी करावी लागेल, याचा अंदाज घेतला जात आहे, असेही त्यांनी सांगितले.राज्यातील शेतक-यांना आपल्या पसंतीच्या कृषी निविष्ठा म्हणजे बियाणे, जैविक खते, सूक्ष्म मूलद्रव्ये, जैविक आणि रासायनिक औषधे तसेच अवजारे खरेदी करता यावीत, यासाठी गुजरात पॅटर्न राबविण्यात येणार आहे. त्यासाठी समिती नेमण्यात आली असून तिचा अहवाल शासनाला प्राप्त झाल्याचे खडसे यांनी सांगितले.या परिषदेस कृषी आयुक्त विकास देशमुख, उपाध्यक्ष डॉ. राम खर्चे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तुकाराम मोरे, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी, साधन सामग्री विभागाचे संचालक डॉ. मधुकर घाग, संशोधन विभागाचे संचालक डॉ. प्रकाश शिनगारे, शिक्षण विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत काकडे आणि प्रशासन विभागाच्या सहसंचालक शुभांगी माने आदी उपस्थित होते.