जिल्हाधिकाऱ्यांची थेट अॅक्शन, गैरहजर असलेल्या 18 जणांना केलं बडतर्फ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 06:53 PM2021-10-27T18:53:27+5:302021-10-27T18:54:01+5:30
वारंवार नोटीस पाठवूनही त्यांच्याकडून कुठलेही उत्तर न आल्याने जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानंतर कार्यक्रम अधिकारी हेमंत कुमार सिंह यांनी कारवाई केली.
गोरखपूर - जिल्ह्याच्या विविध अंगणवाडी केंद्रांवर गेल्या अनेक दिवसांपासून गैरहजर असलेल्या 18 अंगणवाडी कार्यकर्ता, मिनी अंगणवाडी सेविका आणि सहायकांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. म्हणजेच, या सर्वांना बडतर्फ करण्यात आलंय, वारंवार नोटीस पाठवूनही त्यांच्याकडून कुठलेही उत्तर न आल्याने जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानंतर कार्यक्रम अधिकारी हेमंत कुमार सिंह यांनी कारवाई केली.
जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी सांगितले की, बालविकास योजना शहरातील सरिता तिवारी, सुनीता पांडेय, लालदेई, आरती द्विवेदी, राबिया, दुर्गावती देवी, प्रियंबदा सिंह, अंजू देवी, झरना टोला, रीना चौधरी, कैलाशी देवी यांना बडतर्फ करण्यात आलंय. तसेच, बालविकास योजना चरगांवातून सरिता श्रीवास्तव, जंगल कौडिया येथून कुसून देवी यांना हटविण्यात आलंय. बांसगाव येथून कुमारी नेहा, अनिता मौर्य, आत्मा देवी, सुशीला पाल, खोराबार येथून राधिका देवी यांनाही बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. जिल्हा उपक्रम अधिकारी यांनी, रिक्त जागांवर नवीन भरती करण्यात येईल, असेही स्पष्ट केले.
सहा अंगणवाडी कार्यकर्ता, 6 सहायकांची गैरहजेरी
जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांद्वारे 22 ऑक्टोबर रोजी केलेल्या तपासाचा अहवाल आला. त्यामध्ये, जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी अंगणवाडी केंद्रांचे निरीक्षण केले, ज्यामध्ये 6 अंगणवाडी कार्यकर्ता आणि 8 अंगणवाडी सेविकांची केंद्रावर अनुपस्थिती होती.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिले स्पष्टीकरण
जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, सद्यस्थितीत संचारी रोग/दस्तक जागरुकता अभियान संचालित करण्यात येत आहे. त्यामध्ये, अंगणवाडी, कार्यकर्ता आणि सेविकांद्वारे घराघरात जाऊन अभियानातून प्रचार व प्रसार करण्यात येत आहे. मात्र, काही कार्यकर्त्यांकडून निष्काळजीपणा करण्यात येत आहे. त्यामुळे, कामचुकारपणा आणि गैरहजर राहणाऱ्या काहींना नोटीस पाठवून त्यांचा एक महिन्याचा पगार थांबविण्यात आला आहे.