काश्मीरला रेल्वेने थेट जाता येणार; १९ एप्रिलला पंतप्रधान मोदी दाखविणार हिरवा कंदिल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 14:20 IST2025-03-28T14:20:33+5:302025-03-28T14:20:53+5:30
सध्या काश्मीरमध्ये संगलदान ते बारामुल्ला या दरम्यानच रेल्वे धावत आहे

काश्मीरला रेल्वेने थेट जाता येणार; १९ एप्रिलला पंतप्रधान मोदी दाखविणार हिरवा कंदिल
सुरेश एस. डुग्गर, लोकमत न्यूज नेटवर्क, जम्मू: काश्मीर व देशाचा उर्वरित भाग यांना रेल्वेने जोडण्याचे स्वप्न आता १९ एप्रिल रोजी प्रत्यक्षात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कटरा येथून काश्मीर खोऱ्यासाठी रवाना होणाऱ्या रेल्वेला त्या दिवशी हिरवा कंदिल दाखविणार आहे. या ऐतिहासिक महत्वाच्या कार्यक्रमास रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीयमंत्री डॉ. जितेंद्र सिंह, नायब राज्यपाल मनोज सिन्हा, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आदी मान्यवर उपस्थित राहाणार आहेत.
सध्या काश्मीरमध्ये संगलदान ते बारामुल्ला या दरम्यानच रेल्वे धावत आहे. आता लांबपल्ल्याच्या गाड्या जम्मूतील कटरा स्थानकापर्यंत धावणार आहेत. त्यामुळे भारतातील सर्व नागरिकांना पृथ्वीवरील नंदनवन असलेल्या काश्मीरमध्ये रेल्वेमार्गे सुखद प्रवास करता येणार आहे. काश्मीर रेल्वेला हिरवा कंदिल दाखविण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रियासी जिल्ह्यात चिनाब नदीवर बांधलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची पाहणी करणार आहेत. त्या पुलाची निर्मिती व त्यासाठी वापरण्यात आलेले अभियांत्रिकी कौशल्य याबद्दल अधिकारी मोदी यांना यावेळी माहिती देतील. कटरा येथील समारंभानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर ते उधमपूर लष्करी विमानतळावरून नवी दिल्लीला प्रयाण करतील.
४१ हजार कोटींचा खर्च
उधमपुर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वेमार्ग २७२ किलोमीटर लांबीचा आहे. त्यातील २०९ किमी मार्गावरील वाहतूक २००९ पासून सुरू करण्यात आली. रियासी आणि कटरा यांच्यातील अंतिम १७ किलोमीटरचा भाग तीन महिने आधी पूर्ण झाला, ज्यामुळे वंदे भारत एक्स्प्रेससची यशस्वी चाचणी झाली. काश्मीरमधील रेल्वे प्रकल्पाच्या उभारणीसाठी ४१,००० कोटी रुपये खर्च झाले.
वंदे भारत एक्स्प्रेसही धावणार
काश्मीरला विशेष डिझाइन केलेली वंदे भारत मिळणार आहे. ती कटरा ते श्रीनगर दरम्यान धावेल. चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीने ही बनवलेली ही ट्रेन अँटी-फ्रीझिंग तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. ती उणे २० डिग्री सेल्सियसपेक्षा कमी तापमानातही धावेल.
रेल्वेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात असेल
सध्या दिल्ली किंवा इतर शहरांतून काश्मीर खोऱ्यासाठी कोणतीही थेट रेल्वे चालविली जात नाही. त्यामुळे प्रवाशांना काश्मीरला जाण्यासाठी सध्या कटरा व कालांतराने जम्मू येथे रेल्वे बदलावी लागणार आहे. रेल्वेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येईल. चिनाब जगातील या सर्वांत उंच रेल्वे पुलावर ट्रेन ताशी १०० किमी वेगाने धावू शकतील. दुसरा महत्त्वाचा पूल अंजी खड्ड आहे. चिनाब रेल्वे पुलापासून १३ किमी अंतरावर तयार केलेला हा देशातील पहिला केबल-स्टेड रेल्वे पूल आहे.
हे दोन रेल्वे पूल अतिशय महत्त्वाचे ठरणार
श्रीनगरमध्ये रेल्वे पोहोचविण्यात चिनाब रेल्वे पूल, अंजी खड्ड पूल या दोघांचा महत्वाचा वाटा असणार आहे. जम्मू काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात बनलेला चिनाब रेल्वे पूल ३५९ मीटर उंचीचा आहे. त्याची उंची आयफेल टॉवरपेक्षा ३५ मीटरने अधिक आहे. तो बांधण्यासाठी १४८६ कोटी रुपयांचा खर्च झाला. या पुलाची लांबी १३५१ मीटर असून, नदीच्या दोन्ही किनाऱ्यांवर आर्च किंवा मेहराब तंत्राचा वापर करून तो उभारण्यात आला आहे. चिनाब रेल्वे पुलाचे आयुष्यमान अंदाजे साडेदोनशे वर्षे असेल.