पाक रेंजर्सना तेथील लष्कराचा थेट पाठिंबा

By admin | Published: November 3, 2016 06:17 AM2016-11-03T06:17:48+5:302016-11-03T06:17:48+5:30

पाकिस्तानच्या सीमांचे रक्षण करणारे दल आमच्या नागरी वसाहतींना हेतुत: लक्ष्य करीत असून पाकिस्तानचे लष्कर त्या जवानांना थेट पाठिंबा देत असल्याचे सीमा सुरक्षा दलाने बुधवारी म्हटले.

Direct support for the army of Pak Rangers | पाक रेंजर्सना तेथील लष्कराचा थेट पाठिंबा

पाक रेंजर्सना तेथील लष्कराचा थेट पाठिंबा

Next


जम्मू : पाकिस्तानच्या सीमांचे रक्षण करणारे दल आमच्या नागरी वसाहतींना हेतुत: लक्ष्य करीत असून पाकिस्तानचे लष्कर त्या जवानांना थेट पाठिंबा देत असल्याचे सीमा सुरक्षा दलाने बुधवारी म्हटले. आंतरराष्ट्रीय सीमेवरील भारतीय चौक्या आणि नागरी वसाहतींवर पाकिस्तानकडून सतत उखळी तोफमारा होत आहे.
सीमा सुरक्षा दलाचे महानिरीक्षक डी. के. उपाध्याय म्हणाले की, पाक लष्कराचा या रेंजर्सना पाठिंबा आहे. या रेंजर्सनी असंख्यवेळा युद्धविरामाचे उल्लंघन करून गोळीबार केला आहे. त्यांच्याकडून भारतीय नागरी वसाहतींच्या दिशेने मोठ्या प्रमाणावार उखळी तोफांचा मारा होत आहे.
भारताने कधीही पाकिस्तानच्या कोणत्याही नागरी वसाहतींच्या दिशेने गोळीबार केलेला नाही. आमचा मारा हा लष्करी बंकर्सला लक्ष्य करणारा आहे, कारण याच बंकर्समधून पाकिस्तानी जवान गोळीबार करीत आहेत, असेही ते म्हणाले.
आम्ही पाकिस्तानच्या १४ चौक्यांची जबर हानी केली आहे. नागरी भागांना लक्ष्य करून पाकिस्तानने मानवीहक्कांचे व आंतरराष्ट्रीय संकेतांचे उल्लंघन केले आहे, असे ते म्हणाले.
सीमा सुरक्षा दलाने कठुआ जिल्ह्यात २०-२१ आॅक्टोबरच्या रात्रीपासून आंतरराष्ट्रीय सीमेवरून होणारे घुसखोरीचे पाच प्रकार हाणून पाडले. यावर्षी घुसखोरीचे एकूण १४ प्रयत्न उधळून लावण्यात आले. त्यातील तीन तर या दिवाळीत झाले होते. भारतीय हद्दीत घुसण्यासाठी पाकिस्तान सतत दहशतवाद्यांना मदत करीत आहे. परंतु या प्रयत्नांना चोख उत्तर देण्याची सीमा सुरक्षा दलाची पूर्ण तयारी असल्याचे ते म्हणाले. पाकिस्तानच्या बंकर्सनाच बीएसएफने लक्ष्य केल्याची छायाचित्रेही उपाध्याय यांनी दाखविली.
पाककडून वाढत चाललेला उखळी तोफांचा मारा आणि गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर जम्मू आणि काश्मीर सरकारने आंतरराष्ट्रीय सीमेवरील आणि नियंत्रण रेषेवरील ४०० शाळा बंद केल्या आहेत. सीमेवरील गोळीबार व त्याच्या प्रतिउत्तराच्या परिस्थितीचा गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्लीत बैठकीत आढावा घेतला.
राजौरी जिल्ह्यात भीमबेर गली सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवरील भागात पाकने बुधवारी तोफगोळ््यांचा मारा केला. दुपारनंतर पाक रेंजर्संनी शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचे डी. के. उपाध्याय यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. (वृत्तसंस्था)
>चोख उत्तर देऊ : राजनाथ सिंह
नवी दिल्ली : भारत -पाकिस्तान सीमेवर तणाव वाढत असताना राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार तोफमाऱ्याला योग्य ते उत्तर देईल व देशाचा सन्मान अबाधित ठेवण्यासाठी शक्य ते सगळे करील, असे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी म्हटले. जम्मू भागात पाकिस्तानकडून सतत सुरू असलेल्या तोफमाऱ्याबद्दल त्यांना वार्ताहरांनी प्रश्न विचारला होता.

Web Title: Direct support for the army of Pak Rangers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.