कोणतं राज्य देतं देशाला सर्वाधिक महसूल?; महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरात कुठे?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 05:31 PM2019-10-23T17:31:39+5:302019-10-23T17:34:46+5:30

उद्योगांच्या बाबतीत गुजरात आणि महाराष्ट्राची वारंवार तुलना होते

direct tax data show wealth concentrated in 3 states maharashtra tops gujarat fifth in the list | कोणतं राज्य देतं देशाला सर्वाधिक महसूल?; महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरात कुठे?

कोणतं राज्य देतं देशाला सर्वाधिक महसूल?; महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरात कुठे?

Next

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वारंवार ५ ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचा उल्लेख केला. २०२४-२५ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था ५ ट्रिलियनवर नेण्याचा विश्वास मोदींनी अनेकदा व्यक्त केला आहे. मोदी सरकारनं हे उद्दिष्ट गाठल्यास त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होईल. मात्र अर्थव्यवस्थेचा गाडा केवळ मोजकीच राज्यं हाकणार का, हा खरा प्रश्न आहे. 

भारतीय अर्थव्यवस्थेचं सध्याचं चित्र पाहिल्यास एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच राज्यं महसुली उत्पादनात मोठं योगदान देतात. उत्तर भारतातली अनेक राज्यं आकारानं मोठं असली, तरी त्यांच्याकडून फारसा महसूल केंद्राला मिळत नाही. केंद्रीय थेट कर संकलन विभागानं नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र, दिल्ली आणि कर्नाटक या तीन राज्यांमधून देशाला तब्बल ६१ टक्के महसूल मिळतो. याचाच अर्थ उर्वरित सर्व राज्यांमधून देशाच्या तिजोरीत केवळ ३९ टक्के महसूल जातो. 

महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक यांच्या पाठोपाठ तमिळनाडू आणि गुजरातमधून जमा होणारा कर धरल्यास पाच राज्यांमधून केंद्राला ७२ टक्के महसूल मिळतो. यामध्ये व्यक्तींनी आणि कॉर्पोरेट कंपन्यांनी भरलेल्या कराचा समावेश आहे. २०१३-१४ ते २०१८-१९ या कालावधीत महाराष्ट्रानं १९,१७,९४४ कोटी रुपयांचा कर दिला. केंद्राला मिळणारा तब्बल ३७.८५ टक्के महसूल एकट्या महाराष्ट्रातून गेला आहे.
 
महाराष्ट्रापाठोपाठ राजधानी दिल्लीनं देशाच्या तिजोरीत सर्वाधिक महसूल जमा केला आहे. दिल्लीमधून केंद्राला ६,९३,२७५ कोटींचा महसूल मिळाला आहे. देशभरातून केंद्राकडे जमा झालेल्या महसुलातील १३.६८ टक्के वाटा दिल्लीचा आहे. देशाला सर्वाधिक महसूल देणाऱ्या राज्यांच्या यादीत कर्नाटक दुसऱ्या स्थानी आहे. कर्नाटकनं केंद्राला ४,९९,३१० कोटींचा महसूल दिला आहे. म्हणजेच देशाच्या एकूण महसुली उत्पन्नात कर्नाटकचा वाटा ९.८ टक्के इतका आहे.

कर्नाटकपाठोपाठ तमिळनाडूकडूनही केंद्राला मोठा महसूल मिळतो. २०१३-१४ ते २०१८-१९ या कालावधीत तमिळनाडूनं केंद्राला ३,३९,८३६ कोटी रुपयांचा महसूल करांमधून मिळाला आहे. देशाच्या तिजोरीत जमा झालेला ६.७ टक्के महसूल तमिळनाडूनं दिला आहे. महाराष्ट्रासोबत कायम तुलना होणारा गुजरात महसूलच्या बाबतीत पाचव्या स्थानी आहे. गुजरातकडून गेल्या पाच वर्षांत केंद्राला २,३१,३५७ कोटींचा महसूल मिळाला आहे. देशाच्या एकूण उत्पन्नाच्या तुलनेत हा आकडा ४.५६ टक्के इतका आहे.
 

Web Title: direct tax data show wealth concentrated in 3 states maharashtra tops gujarat fifth in the list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.