पोलीस महासंचालकांच्या कारला अपघात, पत्नीचा मृत्यू चालकही गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 10:57 AM2022-10-11T10:57:39+5:302022-10-11T11:00:37+5:30
जैसलमेरच्या जवाहर रुग्णालयात सध्या गाडीच्या ड्रायव्हरवर उपचार सुरू आहेत
जैसलमेरला फिरायला गेलेल्या तेलंगणातील सीआयडी विभागाच्या डीजी गोविंद सिंह यांच्या गाडीला अपघात झाला आहे. रामगढ -तनोट रस्त्यावर आयपीएस अधिकाऱ्यांची एसयुव्ही गाडी पलटी झाली. या भीषण दुर्घटनेत गोविंद सिंह यांची पत्नी शीला सिंह यांचा मृत्यू झाला असून गाडीचा ड्रायव्हर गंभीर जखमी आहे. घटनेची माहिती मिळताच जैसलमेरच्या पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तर, बीएसएफच्या रुग्णवाहिकेनं जखमींना जैसलमेर येथे रुग्णालयात आणण्यात आले.
जैसलमेरच्या जवाहर रुग्णालयात सध्या गाडीच्या ड्रायव्हरवर उपचार सुरू आहेत. तर गोविंद सिंह यांच्यावर उपचार केल्यानंतर ते रामगढला निघून गेले आहेत. तनोट रोडवर घाटातून गाडी जात असताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे गाडी पलटी झाली. रविवारी सकाळी हे जैसलमेर येथे पोहोचले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तनोट मातेचे दर्शन करुन परत येत असताना डीजी गोविंद सिंह यांची कार नियंत्रणाबाहेर गेल्याने ही भीषण दुर्घटना घडली. देवीचं दर्शन घेऊन सीमा परिसरातील पोलीस चौक्यांना पाहून गोविंद सिंह हे पत्नी शीला आणि गनमॅन महेंद्र कुमार यांच्यासमवेत गाडीतून परत येत होते. त्यावेळी, तनोटपासून ४ किमी अंतरावर घाटात गाडी पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात डीजींच्या पत्नी शीला सिंह आणि ड्रायव्हर विजेंद्र जाखड यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे, बीएसएफच्या रुग्णवाहिकेतून त्यांना जैसलमेर येथे नेण्यात आले. मात्र, शील सिंह यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. सध्या चालकावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जैसलमेर एसपी भंवरसिंह नाथावत, सीओ प्रियंका कुमावत, बीएसएफच्या १६६ बटालियनचे कमांडंट विरेंद्रपाल सिंह, इन्स्पेक्टर नंदनलाल हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. रामगढ पोलीस ठाणे सध्या अपघाताचा तपास करत असून कारणांचा शोध घेत आहे.