दिल्लीत कडेकोट सुरक्षा
By Admin | Published: August 15, 2016 05:56 AM2016-08-15T05:56:14+5:302016-08-15T06:31:44+5:30
राष्ट्राला उद्देशून होणारे भाषण आणि अन्य कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीतील सुरक्षाव्यवस्था अत्यंत कडेकोट करण्यात आली
नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनी ऐतिहासिक लाल किल्ल्याहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्राला उद्देशून होणारे भाषण आणि अन्य कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीतील सुरक्षाव्यवस्था अत्यंत कडेकोट करण्यात आली आहे. तसेच खबरदारी म्हणून जम्मू-काश्मीर खोऱ्यातील सुरक्षाही चोख ठेवण्यात आली आहे.
दिल्लीत लाल किल्ला आणि आसपासच्या परिसरात हजारो सुरक्षा कर्मचाऱ्यांना तैनात करून सुरक्षा आवळण्यात आली. पंतप्रधानांच्या भाषणाला केंद्रीय मंत्री, वरिष्ठ अधिकारी, मान्यवर विदेश मान्यवरांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार असल्याने या ठिकाणी सुरक्षा दले करडी नजर ठेवून आहेत.
राजपथाच्या आसपासच्या भागातही बहुस्तरीय सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. या ठिकाणी ‘भारत पर्व’ हा सांस्कृतिक महोत्सव साजरा केला जात आहे. स्वातंत्र्यदिनी सूर्यास्तानंतरही नॉर्थ आणि साऊथ ब्लॉकसह सर्व सरकारी कार्यालयाच्या इमारती आकर्षक रोषणाईने उजळून निघणार आहेत.
गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू-काश्मीरसह देशभरातील सुरक्षास्थितीचा उच्चस्तरीय आढावा घेतला. लाल किल्ला परिसरात लष्कर आणि एनएसजीच्या अधिकाऱ्यांनी विशेष संपर्क आणि नियंत्रण केंद्र स्थापन केले आहे. सीमावर्ती भागासह देशाच्या अन्य भागात सुरक्षाव्यवस्थाही चोख ठेवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>श्रीनगरात चोख सुरक्षा
स्वातंत्र्यदिनानिमित्त संचारबंदी असलेल्या श्रीनगरातही सर्वत्र कडेकोट सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण शहरात निमलष्करी दलाचे जवान आणि पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये स्वातंत्र्य दिनाचा मुख्य सोहळा होणाऱ्या बख्शी स्टेडियमचे रूपांतर किल्ल्यात करण्यात आले आहे. या स्टेडियमकडे जाणारे सर्व रस्ते बंद करून सर्व रस्त्यांवर मोठ्या संख्येने सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
>दहशतवादी हल्ल्यासंदर्भात गुप्तचर विभागाकडून कोणतीही माहिती मिळाली नसली तरी सुरक्षा संस्था कोणतीही जोखीम घेण्यास तयार नाही. त्यामुळे तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. श्रीनगर किंवा इतर ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अतिरिक्त सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे.