Mahua Moitra: एथिक्स कमिटीने विचारले घाणेरडे प्रश्न, महुआ मोईत्रांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 06:34 PM2023-11-02T18:34:26+5:302023-11-02T18:35:29+5:30
Mahua Moitra: कॅश फॉर क्वेरी प्रकरणामधील आरोपांचा सामना करत असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा या आज संसदेच्या एथिक्स समितीसमोर हजर राहिल्या.
कॅश फॉर क्वेरी प्रकरणामधील आरोपांचा सामना करत असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा या आज संसदेच्या एथिक्स समितीसमोर हजर राहिल्या. यावेळी समितीच्या सदस्यांनी मोईत्रा यांना संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात पैसे घेतल्याबाबत प्रश्न विचारले. त्याचदरम्यान महुआ मोईत्रा ह्या तणतणत बाहेर पडल्या. त्यांनी त्याच आवेशात पत्रकारांना माझ्या डोळ्यांत अश्रू दिसताहेत का? असं विचारलं. तसेच एथिक्स समितीच्या अध्यक्षांनी वैयक्तिक आणि अनैतिक प्रश्न विचारल्याचा आरोप महुआ मोईत्रा यांनी केला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महुआ मोईत्रा यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत स्वत: निर्दोष असल्याचे म्हटले आहे. त्यांनी संसदीय समितीला सांगितले की, हा आरोप वकील जय अनंत देहाद्राई यांनी त्यांच्यासोबतचे संबंध तोडल्याने वैयक्तिक शत्रुत्वातून केला आहे. दरम्यान, एथिक्स कमिटीच्या मिटिंगमध्ये महुआ मोईत्रा यांना काँग्रेस खासदार आणि पॅनलमधील सदस्य एन. उत्तम कुमार रेड्डी, बसपाचे दानिश अली यांच्यासह विरोधी पक्षांमधील काही खासदारांचा पाठिंबा मिळाला. तर व्ही. डी. शर्मा यांच्यासह भाजपाच्या काही खासदारांनी मोईत्रा यांनी प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजे, असा आग्रह धरला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एथिक्स कमिटीसमोर महुआ मोईत्रा यांना त्यांच्या जाबाबामध्ये देहाद्राई यांच्यासोबतच्या त्यांच्या संबंधांबाबत विचारण्यात आले. कारण या खटल्यामध्ये महुआ मोईत्रा ह्या देहाद्राई यांनाच दोषी ठरवताना दिसत आहेत. देहाद्राई यांच्या दाव्याचा हवाला देत भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी मोईत्रा यांच्याविरोधात लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी हे प्रकरण एथिक्स समितीकडे सोपवले.