आता दिव्यांग जवानांच्या पेन्शनवर कर आकारला जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 08:39 AM2019-06-26T08:39:38+5:302019-06-26T08:41:55+5:30
अर्थ मंत्रालयाकडून अधिसूचना प्रसिद्ध
नवी दिल्ली: दिव्यांग जवानांना मिळणाऱ्या पेन्शनवर कर आकारण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतला आहे. तिन्ही दलांसाठी हा नियम लागू असेल. याआधी सैन्य दलातून कर्तव्य बजावून निवृत्त झालेल्या जवानांना मिळणारी पेन्शन करमुक्त होती. मात्र आता यात बदल करण्यात आला आहे. या संदर्भातली अधिसूचना अर्थ मंत्रालयानं प्रसिद्ध केली आहे.
1922 च्या कायद्यानुसार सैनिकांना मिळणारी पेन्शन करमुक्त होती. अधिकाधिक जणांनी ब्रिटिशांसाठी लढावं या हेतूनं पेन्शनवर कर आकारला जात नव्हता. तोफखाना विभागात आणि हवाई दलात वैमानिक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींच्या शरीरावर प्रतिकूल परिणाम होतो. मात्र यातील मोजकेच जवान सेवा निवृत्त होतात. सेवा निवृत्त झालेल्या जवानांना आणि दिव्यांग जवानांना मिळणाऱ्या पेन्शनवर सध्या कर लागत नाही. मात्र आता यात बदल करण्यात आला आहे.
तिन्ही दलातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या 25 लाखांच्या घरात आहे. या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळते. आपला संपूर्ण कार्यकाळ पूर्ण केलेल्या अनेक जवानांना आणि अधिकाऱ्यांना अपंगत्व आलं आहे. या निवृत्त जवानांना आणि अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या पेन्शनवर यापुढे कर आकारला जाईल. या पेन्शनचा दुरुपयोग होत असल्याचे आरोप झाले होते. सरकारनं चालू वर्षात जवानांच्या पेन्शनसाठी 1 कोटी 12 लाख 80 कोटींची तरतूद केली आहे.