Hijab Ban: हिजाब बंदीबाबत सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींमध्ये मतभेद, आता प्रकरण सरन्यायाधीशांकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 11:23 AM2022-10-13T11:23:03+5:302022-10-13T11:23:48+5:30
Hijab Ban: हिजाब बंदीच्या खटल्याबाबत सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनीं वेगवेगळं मत नोंदवल्याने आता हा खटला सरन्यायाधीशांकडे पाठवण्यात आला असून, मोठ्या खंडपीठाकडून या प्रकरणावर सुनावणी घेण्याची विनंती त्यांना करण्यात आली आहे.
नवी दिल्ली - वादाचे केंद्र बनलेला कर्नाटकमधील हिजाब बंदीच्या निर्णयावर आज सुप्रीम कोर्टाने आपला निकाल सुनावला आहे. मात्र या खटल्याबाबत सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनीं वेगवेगळं मत नोंदवल्याने आता हा खटला सरन्यायाधीशांकडे पाठवण्यात आला असून, मोठ्या खंडपीठाकडून या प्रकरणावर सुनावणी घेण्याची विनंती त्यांना करण्यात आली आहे.
कर्नाटक उच्च न्यायालयाने हिजाब बंदीबाबत दिलेल्या निर्णयाविरोधात याचिकाकर्त्यांनी २४ मार्च रोजी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या यांच्या खंडपीठासमोर १० दिवस युक्तिवाद झाला. त्यादरम्यान मुस्लिम पक्षाने हिजाबची तुलना ही पगडी आणि क्रॉसशी केली. त्यावर न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांनी याबाबत परखड मत नोंदवलं होतं. दहा दिवस चाललेल्या सुनावणीनंतर २२ सप्टेंबर रोजी खंडपीठाने आपला निर्णय सुरक्षित ठेवला.
यावर्षी जानेवारी महिन्यात उडुपीमधील एका सरकारी कॉलेजमधून या वादाला सुरुवात झाली होती. तिथे विद्यार्थिनींना हिजाब घालून येण्यास बंदी घालण्यात आली होत. ही बाब शाळेच्या युनिफॉर्म कोडविरोधात असल्याचे कॉलेज प्रशासनाने म्हटले होते. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेले होते. तिथे कर्नाटक हयकोर्टाने १५ मार्च रोजी निर्णय देताना उडुपीमधील कॉलेजमधील विद्यार्थिनींना वर्गात हिजाब घालण्याची परवानगी मागणारी याचिका फेटाळून लावली होती. तसेच हिजाब हा इस्लाममधील आवश्यक धार्मिक प्रथांचा भाग नसल्याचे सांगितले होते.