‘राज्यपालांच्या विधानाचा विपर्यास’
By admin | Published: November 29, 2015 01:18 AM2015-11-29T01:18:40+5:302015-11-29T01:18:40+5:30
हिंदुस्थान हा हिंदूंचाच असल्याच्या आसामच्या प्रभारी राज्यपालांच्या वक्तव्याचे भाजपने शनिवारी समर्थन केले. राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांना पदावरून हटविले जाणार नाही, असे संकेतही देण्यात आले.
गुवाहाटी : हिंदुस्थान हा हिंदूंचाच असल्याच्या आसामच्या प्रभारी राज्यपालांच्या वक्तव्याचे भाजपने शनिवारी समर्थन केले. राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांना पदावरून हटविले जाणार नाही, असे संकेतही देण्यात आले.
आचार्य यांचे विधान विपर्यस्त स्वरूपात समोर आणले गेले आहे. आचार्यांच्या विधानावरून मुख्यमंत्री तरुण गोगोई हे लोकांची दिशाभूल करीत आहेत, असे भाजपचे सरचिटणीस राम माधव येथे पत्रकार परिषदेत म्हणाले. तरुण गोगोई सरकारकडे लोकांना सांगण्यासारखा कोणताही प्रश्न नसल्यामुळे ते जो प्रश्नच नाही त्यावरून लोकांची दिशाभूल करीत आहेत, असे राम माधव म्हणाले. आचार्य यांना पदावरून हटवावे ही राज्य सरकारची मागणी मान्य करून राज्यपालांची कायमस्वरूपी नेमणूक करणार का, असे विचारता राम माधव यांनी या क्षणाला तरी तसे काही होणार नसल्याचे संकेत दिले. लोक अनेक मागण्या करीत असतात. त्याला काढा, तिला हटवा असे लोक म्हणतात; परंतु अशा पद्धतीने काम कसे करता येईल? असे ते म्हणाले. हिंदुस्थान हा हिंदूंचाच असल्याचे वादग्रस्त विधान पद्मनाभ आचार्य यांनी २१ नोव्हेंबर रोजी केले होते. त्याचा खुलासा दुसऱ्या दिवशी करताना आचार्य यांनी भारतीय मुस्लिम पाकिस्तानात जायला स्वतंत्र आहेत, असे म्हटले होते. यामुळे वाद आणखी चिघळला व गोगोई व इतरांनी त्यांना पदावरून हटविण्याची मागणी केली होती.
मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी सोमवारी आचार्य यांना पदावरून हटविण्याची मागणी करताना राज्यपालांना आपल्या घटनादत्त पदाची प्रतिष्ठा राखणे माहिती नसल्याचे म्हटले होते. असल्या व्यक्तींना राज्यपालपदी नेमून व त्यांच्या विधानांनी देशाच्या एकतेला आणि एकात्मतेला तडा जातो, असे म्हटले होते. आसाम प्रदेश काँग्रेस समितीने आचार्य यांना हटविण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी येथे मोर्चा काढला होता. आचार्य यांना ताबडतोब हटविण्याची मागणी समाजवादी पक्षाचे नेते आझम खान आणि बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनीही केली आहे.