निर्गुंतवणूक, निवडणूक रोख्यांंवरून विरोधकांचा संसदेत गदारोळ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 02:12 AM2019-11-22T02:12:07+5:302019-11-22T02:12:21+5:30
मोठे आर्थिक घोटाळे असल्याचा आरोप
नवी दिल्ली : भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल)सहित काही सार्वजनिक उपक्रमांमध्ये होऊ घातलेली निर्गुंतवणूक प्रक्रिया, निवडणूक रोखे खरेदी करणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवण्याचा निर्णय हे खूप मोठे आर्थिक घोटाळे आहेत, अशी टीका करीत विरोधी पक्षांनी लोकसभेमध्ये गुरुवारी गदारोळ माजविला.
या मुद्यांवरून काँग्रेसचे खासदारांनी सभागृहाच्या हौद्यामध्ये जमा होऊन सुमारे पंधरा मिनिटे निदर्शने केली. मात्र, हे विषय शून्य प्रहरात उपस्थित करण्याची परवानगी देण्याची लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी तयारी दाखविल्यानंतर काँग्रेसचे सदस्य आपल्या आसनांवर पुन्हा विराजमान झाले.
निर्गुंतवणूक प्र्रक्रिया, निवडणूक रोखे हा मोठा आर्थिक घोटाळा असून, त्याद्वारे देशाची लूट होत आहे, असा आरोप काँग्रेसने केला. लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीररंजन चौधरी म्हणाले की, सभागृहाचे कामकाज सुरळीत पार पडण्यासाठी विरोधक सहकार्य करीत असून, लोकसभाध्यक्ष मात्र त्यांच्याशी तसे वागत नाहीत. त्यावर संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले, पंतप्रधान नरेंद्र मोदी अत्यंत स्वच्छ कारभार करीत असून, त्यामुळे भ्रष्टाचार होणे शक्यच नाही.
बीपीसीएल, शिपिंग कॉर्पोरेशन आॅफ इंडियासहित पाच सार्वजनिक उपक्रमांमध्ये निर्गुंतवणूक करण्याचे केंद्र सरकारने बुधवारी जाहीर केले. निवडणूक रोखे खरेदी करणाऱ्यांची ओळख गोपनीय राखण्याचा निर्णयही घेण्यात आला. त्याला काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी जोरदार विरोध केला आहे.
कामकाज तहकूब
निवडणूक रोखे व काही सार्वजनिक उपक्रमांमधील निर्गुंतवणूक प्रक्रिया या विषयांवर चर्चा करण्यास सभापतींनी परवानगी नाकारल्याच्या निषेधार्थ काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी गदारोळ माजविल्याने राज्यसभेचे कामकाज गुुरुवारी दुपारपर्यंत तहकूब करण्यात आले.
अन्य कामकाज बाजूला ठेवून या दोन विषयांवर प्राधान्याने चर्चा करावी, अशी विरोधकांची भूमिका होती. ती सभापती व्यंकय्या नायडू यांनी अमान्य केल्याने विरोधकांनी इतका गदारोळ माजविला की, सभागृहाचे कामकाज करणे अशक्य झाले होते.