सिंह यांच्या ओएसडीविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई; रेल्वेमंत्र्यांविषयी घेतले होते आक्षेप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2019 05:42 AM2019-01-02T05:42:38+5:302019-01-02T05:42:50+5:30
नवी दिल्ली : सरकारच्या वेबसाईटवरील आपल्या एका लेखात रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यावर आक्षेप घेतल्याप्रकरणी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बुद्धिमत्तेवर प्रश्नचिन्ह ...
नवी दिल्ली : सरकारच्या वेबसाईटवरील आपल्या एका लेखात रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यावर आक्षेप घेतल्याप्रकरणी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बुद्धिमत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याबद्दल रेल्वे मंत्रालयाने केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचे ओएसडी (विशेष कार्य अधिकारी) संजीव कुमार यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे.
रेल्वे बोर्डाचे सचिव रंजनीश सहाय यांनी कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाला पत्र लिहून शिष्टाचाराचे उल्लंघन प्रकरणात भारतीय रेल्वे कार्मिक सेवेच्या २००५ च्या बॅचचे अधिकारी संजीव कुमार यांना तात्काळ रेल्वे खात्यात परत पाठवण्यात यावे, असे म्हटले आहे. संजीव कुमार हे जितेंद्र सिंह रेल्वे सेवेतील वरिष्ठ अधिकारी आहेत. त्यांचा लेख रेलसमाचार डॉट कॉमवर आणि नॅशनल व्हिल्स डॉट कॉम या दोन वेबसाईटवर प्रकाशित झाला होता.
कामकाज व्यवस्थित नाही
संजीव कुमार यांनी आपल्या लेखात म्हटले होते की, रेल्वे मंत्रालयातील कामकाज व्यवस्थित चाललेले नाही. त्यामुळे पंतप्रधान कार्यालयाने यात तात्काळ हस्तक्षेप करण्याची गरज आहे. तथापि, केडर संबंधित विषयांवर प्रश्न उपस्थित करणाºया एका अधिकाºयाची रेल्वे मंत्रालयाने बदली केली आहे.