राहुल गांधी यांना शिस्तपालन समितीची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2016 03:08 AM2016-03-15T03:08:09+5:302016-03-15T03:08:09+5:30
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वातील लोकसभेच्या शिस्तपालन समितीने काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि अमेठीचे खासदार राहुल गांधी यांना सोमवारी नोटीस बजावून
नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वातील लोकसभेच्या शिस्तपालन समितीने काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि अमेठीचे खासदार राहुल गांधी यांना सोमवारी नोटीस बजावून स्वत:ला ब्रिटिश नागरिक जाहीर करण्यासंदर्भातील आरोपांवर स्पष्टीकरण मागितले आहे. तुम्ही कधी स्वत:ला ब्रिटिश नागरिक म्हटले होते काय? असा सवाल त्यांना करण्यात आला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने सरकारवर महत्त्वाच्या मुद्यांवरून लक्ष विचलित करण्याचा हा डाव असल्याचा आरोप केला. राहुल यांनीसुद्धा आपण हे प्रकरण योग्यरीत्या हाताळू असे सांगितले.
भाजपचे खासदार महेश गिरी यांनी यासंदर्भात लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याकडे तक्रार केली होती आणि अध्यक्षांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ही तक्रार पुढील कार्यवाहीसाठी शिस्तपालन समितीकडे वर्ग केली होती. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी राहुल गांधी यांच्या ब्रिटिश नागरिकत्वासंदर्भात केलेल्या आरोपांवर योग्य कारवाई करण्याची मागणी गिरी यांनी आपल्या तक्रारीत केली होती. गांधी यांनी त्या देशात एक कंपनी सुरू करण्यासाठी स्वत:ला ब्रिटिश नागरिक सांगितले होते, असा दावा स्वामी यांनी केला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)