पाच मोठ्या विक्रेत्यांची माहिती उघड करा; केंद्र सरकारने दिले आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 03:55 AM2019-10-22T03:55:12+5:302019-10-22T06:10:43+5:30
अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांना आपल्या पाच मोठ्या विक्रेत्यांची नावे, तसेच भांडवली संरचना आणि साठ्यांचा तपशील सादर करण्याचे आदेश उद्योग व अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने (डीपीआयआयपी) दिले आहेत.
नवी दिल्ली:अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांना आपल्या पाच मोठ्या विक्रेत्यांची नावे, तसेच भांडवली संरचना आणि साठ्यांचा तपशील सादर करण्याचे आदेश उद्योग व अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने (डीपीआयआयपी) दिले आहेत. या कंपन्यांकडून थेट परकीयगुंतवणूक (एफडीआय) विषयक नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी देशातील व्यापारी संघटनांनी केल्यानंतर या कंपन्यांकडून हा तपशील मागविण्यात आला आहे.
ई-कॉमर्स क्षेत्रातील या बलाढ्य कंपन्यांकडून मागविण्यात आलेल्या माहितीत त्यांच्या पाच मोठ्या विक्रेत्यांची नावे, गुंतवणूक आणि व्हेंडरांसोबतचे कमिशन करार यांचा समावेश आहे. वस्तू व सेवाकराविषयी ई-कॉमर्स संस्थांची काही तक्रार आहे का, याची विचारणाही या बहुराष्ट्रीय कंपन्यांकडे करण्यात आली आहे. डीपीआयआयटीने या कंपन्यांना एक पत्र पाठवून वरील तपशील त्यांच्याकडून मागविला आहे.
कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (सीएआयटी) यासह काही व्यापारी संघटनांनी अॅमेझॉन व फ्लिपकार्ट यांच्या विरोधात तक्रारी केल्या होत्या. त्या अनुषंगाने डीपीआयआयटीने या कंपन्यांना एक प्रश्नावली पाठविली आहे.
पीयूष गोयल यांचा इशारा
भारताच्या ई-कॉमर्स धोरणाचे उल्लंघन केल्यास ई-कॉमर्स कंपन्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी नुकताच दिला आहे.