टाटाचे संचालक मंडळ बरखास्त करा
By admin | Published: December 22, 2016 12:42 AM2016-12-22T00:42:28+5:302016-12-22T00:42:28+5:30
टाटांच्या सर्व सूचीबद्ध कंपन्यांतून बाहेर पडल्यानंतर, सायरस मिस्त्री यांनी राष्ट्रीय कंपनी कायदा लवादासमोर याचिका दाखल केली असून,
मुंबई : टाटांच्या सर्व सूचीबद्ध कंपन्यांतून बाहेर पडल्यानंतर, सायरस मिस्त्री यांनी राष्ट्रीय कंपनी कायदा लवादासमोर याचिका दाखल केली असून, टाटा सन्सचे हंगामी चेअरमन रतन टाटा आणि कंपनीचे संपूर्ण संचालक मंडळ बरखास्त करण्याचा आदेश देण्याची विनंती लवादास केली आहे. नवे संचालक मंडळ नियुक्त होईपर्यंत कंपनीवर प्रशासक नेमण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.
५0 वर्षीय मिस्त्री यांनी याचिकेत म्हटले आहे की, टाटा सन्सवर प्रशासक म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींची नेमणूक करण्यात यावी, तसेच विद्यमान संचालक अल्पमतात यावे, यासाठी स्वतंत्र संचालकांची नेमणूकही मोठ्या संख्येने करण्यात यावी. सायरस मिस्त्री यांनी टाटा सन्स आणि टाटाचे विश्वस्त यांच्या विरोधात कंपनी कायद्याच्या कलम २४१, २४२, आणि २४४ अन्वये याचिका दाखल केली आहे. कंपनीतील गैरकारभार आणि अल्पसंख्य भागधारकांच्या हिताशी संबंधित ही कलमे आहेत. मिस्त्री यांचे कुटुंब १८.५ टक्के समभागासह टाटा सन्समध्ये ५0 वर्षांपासून अल्पसंख्य भागधारक आहे. हे प्रकरण लवादापुढे गुरुवारी सुनावणीसाठी येणार आहे.
मिस्त्री यांनी याचिकेत म्हटले की, टाटा व एक विश्वस्त नोशीर सुनावाला यांनी टाटांच्या सूचीबद्ध कंपन्यांतील संवेदनक्षम कागदपत्रे बेकायदा हस्तगत केली आहेत. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश लवादाने
द्यावेत. (वाणिज्य प्रतिनिधी)