नेहरू म्युझियममध्ये फेरबदलापूर्वी चर्चा करा
By admin | Published: September 6, 2015 04:01 AM2015-09-06T04:01:45+5:302015-09-06T04:01:45+5:30
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने गांधी स्मृती, ललित कला अकादमी, तसेच नेहरू स्मारक म्युझियम आणि वाचनालयासारख्या ३९ संस्थांमध्ये व्यापक फेरबदलाची प्रक्रिया सुरू
नवी दिल्ली : केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने गांधी स्मृती, ललित कला अकादमी, तसेच नेहरू स्मारक म्युझियम आणि वाचनालयासारख्या ३९ संस्थांमध्ये व्यापक फेरबदलाची प्रक्रिया सुरू केली असताना देशातील बुद्धिजीवींनी सरकारच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
सरकारमधील काही लोकांच्या बेजबाबदार वक्तव्यांमुळे नेहरू स्मारक म्युझियम आणि वाचनालयाची भूमिका आणि प्रतिष्ठा धोक्यात आली असून, या संस्थेत कुठलाही फेरबदल करण्यापूर्वी यावर जाहीर चर्चा घडविण्यात यावी, अशी मागणी पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपालकृष्ण गांधी यांच्यासह चार प्रमुख बुद्धिजीवींनी शनिवारी केली. यामध्ये गांधी यांच्याशिवाय रोमिला थापर, ज्येष्ठ चित्रपट अभिनेते गिरीश कर्नाड आणि संशोधक अनन्या वाजपेयी यांचा समावेश आहे. या स्वायत्त संस्था असून, देशवासीयांचे संसाधन आहे.
एखादा राजकीय पक्ष, तत्कालीन सरकार, विचारसरणी अथवा मंत्रालयाच्या विभागाची ही खासगी मालमत्ता नाही, असे मत या बुद्धिजीवींनी या निर्णयाविरुद्ध काढलेल्या निवेदनात व्यक्त केले आहे. तीनमूर्ती ग्रंथालयाचे आवश्यक कार्य, दर्जा आणि स्वायत्ततेला नुकसान पोहोचविणे अथवा विकृत स्वरूप देणे कदापि स्वीकारार्ह नाही, अशा कडक शब्दांत त्यांनी सरकारला ठणकावले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)