महिलांचा सहभाग वाढवण्यावर RSS करणार चर्चा; दैनंदिन शाखांची संख्या एक लाखांपर्यंत नेणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 05:31 AM2023-03-13T05:31:21+5:302023-03-13T05:31:45+5:30
२०२० च्या तुलनेत ३७०० ठिकाणी संघाच्या शाखा वाढल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क, समलखा (हरयाणा) :राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) च्या वार्षिक प्रतिनिधी सभेत संस्थेच्या सामाजिक जागृती कार्यक्रमांमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्यावर चर्चा केली जाईल, अशी माहिती संघाचे सह सरकार्यवाह मनमोहन वैद्य यांनी रविवारी दिली.
आरएसएसच्या वार्षिक अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची तीन दिवसीय बैठक येथे रविवारपासून सुरू झाली. त्यात संघटनेच्या गेल्या वर्षभरातील कामाचा आढावा घेण्यात येणार असून आगामी वर्षाच्या कामाचा आराखडा तयार करण्यात येणार आहे.
देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठराव मंजूर करणार असून त्यात स्वावलंबनावर भर देण्यात येणार असल्याचे वैद्य यांनी सांगितले.
संघाची महिलांसाठी समर्पित शाखा असून ती राष्ट्र सेविका समिती म्हणून ओळखली जाते. सामाजिक प्रबोधन, जनजागृती, सामाजिक परिवर्तनाशी संबंधित कामांमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्याबाबत बैठकीत चर्चा होणार आहे, असेही ते म्हणाले.
असा विस्तारतोय संघ
वैद्य म्हणाले की, संघाच्या शताब्दी वर्षाची सुरुवात लक्षात घेऊन दैनंदिन शाखांची संख्या एक लाखांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सध्या देशभरात संघाच्या ६८,६५१ शाखा आहेत, त्यापैकी ६० टक्के विद्यार्थ्यांच्या आहेत, १० टक्के प्रौढ आहेत आणि ३० टक्के कार्यरत लोकांच्या आहेत. २०२० च्या तुलनेत ३७०० ठिकाणी संघाच्या शाखा वाढल्या आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"