मुद्द्याची गोष्ट : चर्चा बुलडोझर आणि एन्काउंटरच्या राजकारणाची

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 09:54 AM2023-04-23T09:54:39+5:302023-04-23T09:55:15+5:30

मुद्द्याची गोष्ट : अनेक दशकांपासून उत्तर प्रदेशात माफियाराज चालविणारा अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची हत्या तसेच अतिकचा मुलगा असद व शूटर गुलाम यांचे एन्काउंटर या घटनांनंतर देशभरात योगी सरकारच्या बुलडोझर आणि एन्काउंटरच्या राजकारणाची चर्चा सुरू झाली आहे.

Discuss the politics of bulldozers and encounters of Up atik ahmed and ashraff | मुद्द्याची गोष्ट : चर्चा बुलडोझर आणि एन्काउंटरच्या राजकारणाची

मुद्द्याची गोष्ट : चर्चा बुलडोझर आणि एन्काउंटरच्या राजकारणाची

googlenewsNext

राजेंद्र कुमार
ज्येष्ठ पत्रकार

उत्तर प्रदेशातील माफियाराज संपविण्याठी योगी आदित्यनाथ यांच्या  सरकारने उचललेल्या अशा धोरणाला अनेक जण योग्य ठरवीत आहेत, तर दुसरीकडे टीकादेखील होत आहे. मात्र, या चर्चांमधून काहीही निष्पन्न झाले तरी चांगल्या कायदा आणि सुव्यवस्थेसाठी राबविण्यात येणारी मोहीम पाहता योगी सरकारसाठी एप्रिल महिना ‘लकी’ ठरत असल्याचे बोलले जात आहे. यूपीमध्ये दहशत पसरविणाऱ्यांबद्दल योगी सरकार कोणत्याही प्रकारे औदार्य दाखविणार नाही, हा संदेश जनमानसात गेला आहे.

जात-धर्म पाहून कठोर कारवाई केली जात नसल्याचा दावाही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. गेल्या सहा वर्षांपासून अतिकविरोधात मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र, आमदार राजू पाल हत्याप्रकरणातील साक्षीदार उमेश पाल याची २४ फेब्रुवारीला असद आणि त्याच्या साथीदारांनी दिवसाढवळ्या हत्या केली आणि त्यानंतरच अतिकवरील कारवाईवर मोहोर लागली. उमेशच्या साक्षीमुळे अतिक आणि अशरफला कठोर शिक्षा झाली असती. त्यामुळेच अतिकभोवती कारवाईचा फास आवळला.

अतिक आणि टोळी नंबर ‘आयएस २२७’ 
अतिक हा हायस्कूल फेल. त्याचे वडील हाजी फिरोज टांगा चालवायचे. तेदेखील गुन्हेगारी प्रवृत्तीचे होते. आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे अतिकही गुन्हेगारीकडे वळला. वयाच्या १९ व्या वर्षी १९७९ मध्ये त्याच्याविरोधात हत्येचा पहिला गुन्हा दाखल झाला. त्याचा अंत झाला त्यावेळी एकूण ११७ गुन्हे दाखल होते. त्यात हत्या, हत्येचा प्रयत्न, दरोडा, जमिनी बळकाविणे, इत्यादी गुन्ह्यांचा समावेश आहे. यूपीचा पहिला गँगस्टर असल्याचा मुकुटही त्याच्याच शिरपेचावर होता. १९८६ मध्ये गुंडा ॲक्ट लागू झाला आणि त्याचवर्षी अतिकविरोधात त्याअंतर्गत कारवाई करण्यात आली. पोलिसाच्या रेकॉर्डमध्ये अतिकची टोळी ‘आयएस २२७’ या नावाने ओळखली जाते. 

अतिक, अशरफची राजकीय कारकीर्द 
प्रयागराजमध्ये अतिकचे चर्चे गेल्या २५ वर्षांपासून सुरू आहेत. गुन्हेगारी कारवायानंतर त्याने पाहतापाहता राजकारणात एन्ट्री केली. अतिकने १९८९ मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविली. त्यानंतर तो अलाहाबाद शहर येथून १९९१, १९९३, १९९६ आणि २००२ मध्ये निवडणुकीत विजयी झाला. तो पाच वेळा आमदार आणि एक वेळ खासदार झाला. समाजवादी पार्टीच्या तिकिटावर तो १९९६ मध्ये आमदार झाला, तर २००२ मध्ये तो अपना दल (सोनेलाल) मध्ये गेला. त्यावेळी त्याने पक्षाच्या दोन उमेदवारांनाही विजय मिळवून दिला होता. नंतर तो पुन्हा सपामध्ये परतला आणि फुलपूर येथून खासदार झाला. ही जागा एकेकाळी पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांची होती. 

मायावतींनी सर्वप्रथम चालविला बुलडोझर 
माफिया अतिकचे साम्राज्य विशाल होते. त्याच्या अवैध संपत्तीवर सर्वप्रथम बुलडोझर चालविण्याची हिंमत मायावतींनी दाखविली होती. लखनौमध्ये १९९५ मध्ये झालेल्या गेस्ट हाऊस कांडावरून त्या प्रचंड नाराज होत्या. त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अतिकवर आरोप होते. २००७ मध्ये त्या पूर्ण बहुमताने मुख्यमंत्री झाल्या, त्यावेळी त्यांनी अतिकभोवती फास आवळला. त्यांनी त्याला तुरुंगात पाठविले आणि त्याची राजकीय कारकीर्द संपविली. म्हणूनच त्यांनी अतिकच्या पत्नीला पक्षात प्रवेश दिल्यावरून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अतिकसारख्या बाहुबलींना राजकीय आश्रय मिळतो, म्हणूनच त्याचे साम्राज्य वाढतच गेले, असे बोलले जात आहे.

यूपीमध्ये निम्म्या आमदारांविरोधात गुन्हे दाखल
अतिकच्या हत्येनंतर गुन्हेगार आणि राजकारणाची चर्चा होत आहे. यूपीमध्ये ५१ टक्के आमदारांविरोधात गुन्हे दाखल आहेत. ‘एडीआर’च्या अहवालानुसार, १५८ आमदारांविरोधात हत्या, बलात्कार, अपहरण यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. अशा प्रकारचे गुन्हे असलेले सर्वाधिक ९० आमदार भाजपमध्ये, तर ४८ आमदार सपामध्ये आहेत. काँग्रेसमध्ये २, तर बसपमध्ये १ आमदार आहे.

ईडीची कारवाई
अतिकविरोधात ईडीनेही २०२१ मध्ये कारवाई केली होती. त्याच्या नातेवाइकांवर मारलेल्या छाप्यांमध्ये १०० हून अधिक बेनामी मालमत्ता, २०० हून अधिक बँक खाती तसेच ५० बोगस कंपन्यांशी संबंधित कागदपत्रे जप्त केली आहेत. यूपी पोलिसांनी अतिकच्या टोळीविरोधात १४४ कारवाया केल्या.

१८३ गुन्हेगारांचे सहा वर्षांत एन्काउंटर 
योगी सरकारच्या कार्यकाळात एन्काउंटर आणि बुलडोझर कारवाईचे मॉडेल हिट ठरले आहे. पोलिसांनी १८३ गुन्हेगारांचा खात्मा केला आहे. सोशल मीडियावर मीम्स व्हायरल होत आहेत. विरोधी पक्षांकडून पोलिसांची कारवाई एकतर्फी असल्याचे आरोप होत आहेत. केवळ अल्पसंख्याकांनाच लक्ष्य करण्यात येत असल्याचाही आरोप होत आहे. मात्र, १८३ गुन्हेगारांपैकी ५७ जण मुस्लीम, तर २६ गुन्हेगार हिंदू होते.

वर्ष     मारले गेलेले गुन्हेगार
२०१७     २८ 
२०१८     ४१ 
२०१९     ३४ 
२०२०     २६ 
२०२१     २६ 

  • २०२२     १४ 

२०२३     १४ 

आधी बुलडोझर, मग राजकीय आश्रय
अतिकचे मुलायमसिंह यादव आणि बसपच्या मायावतींसोबत चांगले संबंध निर्माण झाले होते. एकेकाळी अतिकचा प्रचंड विरोध करणाऱ्या मायावतींनी अतिकची पत्नी शाइस्ता परवीन, जी आता फरार आहे आणि मुलाला बसपमध्ये प्रवेश दिला. हा सर्वांसाठी आश्चर्याचा धक्का होता.

Web Title: Discuss the politics of bulldozers and encounters of Up atik ahmed and ashraff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.