भाजपाची विरोधकांशी चर्चा
By admin | Published: June 16, 2017 03:47 AM2017-06-16T03:47:52+5:302017-06-16T03:47:52+5:30
भाजपा नेत्यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विविध पक्षांशी चर्चा सुरू केली असून, नगरविकासमंत्री वेंकय्या नायडू यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार
- हरिष गुप्ता। लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भाजपा नेत्यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विविध पक्षांशी चर्चा सुरू केली असून, नगरविकासमंत्री वेंकय्या नायडू यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोलणी केली. त्यांनी आज तेलुगू देसमचे अध्यक्ष व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याशीही चर्चा केली.
वेंकय्या नायडू यांनी काल प्रफुल पटेल यांच्याशी संपर्क साधून, आपणास शरद पवार यांना भेटण्याची इच्छा असल्याचे सांगितले होते. पण पवार दिल्लीत नव्हते. त्यामुळे आज ते पवार यांच्याशी फोनवर बोलले. आपण दिल्लीत आल्यावर प्रत्यक्ष बोलू, असे पवार यांनी नायडू यांना सांगितले आहे. वेंकय्या नायडू यांनी चंद्राबाबू यांनाही चर्चेसाठी दिल्लीत येण्याचे निमंत्रण दिले आहे.
अर्थात राष्ट्रपतीपदासाठी कोणत्याही विशिष्ट नेत्याचे नाव या चर्चेत न घेण्याचे भाजपाने ठरवले आहे. विरोधी नेत्यांकडून आधी त्यांच्या सूचना ऐकून घ्या, असे पंतप्रधानांनी आपल्या नेत्यांना सांगितले आहे.
आपल्या हातातील पत्ते लगेच उघड न करण्याचे भाजपाचे प्रयत्न आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांची बैठक पुढील सोमवार वा मंगळवारी राजधानीत होईल. त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर भाजपा नेते पुन्हा विरोधकांना भेटतील आणि भाजपा २३ जूनपर्यंत राष्ट्रपतीपदाचा उमेदवार जाहीर करेल, असे दिसते. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट अमित शाह रविवारी घेणार आहेत. शाह शुक्रवारी मुंबईत पोहोचत आहेत.
पहिली फेरी रविवारपर्यंत पूर्ण करणार
नायडू आणि गृहमंत्री राजनाथ सिंह उद्या काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी व मार्क्सवादी नेते सीताराम येचुरी यांना भेटणार आहेत. अरुण जेटली शुक्रवारी रात्री परदेशातून परत आल्यावर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी चर्चा करणार आहेत. विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चेची पहिली फेरी भाजपा रविवारपर्यंत पूर्ण करणार आहे.