लोकसभाध्यक्षपदासाठी भाजपमध्ये विचारविमर्श
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 06:27 AM2019-05-28T06:27:15+5:302019-05-28T06:27:27+5:30
लोकसभा निवडणुकांत अभूतपूर्व यश मिळविल्यानंतर दुसऱ्यांदा पंतप्रधानपदावर विराजमान होणा-या नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीचा शानदार सोहळा ३० मे रोजी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात होणार आहे.
- हरिश गुप्ता
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांत अभूतपूर्व यश मिळविल्यानंतर दुसऱ्यांदा पंतप्रधानपदावर विराजमान होणा-या नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीचा शानदार सोहळा ३० मे रोजी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात होणार आहे. लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी कर्नाटकमधील भाजपचे ज्येष्ठ खासदार प्रल्हाद जोशी, केंद्रीय मंत्री संतोष गंगवार, नरेंद्रसिंह तोमर यांची नावे चर्चेत असून, उपाध्यक्षपद शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे.
उकाड्याचा त्रास टाळण्यासाठी शपथविधी समारंभ सायंकाळी होईल. विविध देशांचे प्रमुख, राज्यांतील मुख्यमंत्री, इतर नेते याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.
अमित शहांकडे दुहेरी जबाबदारी?
प्रकृती अस्वास्थ्यामुळे अरुण जेटली मंत्रीपद स्वीकारणार नसल्यास भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात सामील व्हावे असा पक्षाचा आग्रह आहे. तसे झाल्यास पक्षाध्यक्षपदी दुसºया व्यक्तीची निवड होईपर्यंत अमित शहा यांच्याकडे दोन्हींची जबाबदारी असेल. राजनाथ सिंह यांनीही मंत्रीपद व अध्यक्षपद अशी दुहेरी जबाबदारी काही काळ सांभाळली होती.