चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच
By admin | Published: December 29, 2014 03:59 AM2014-12-29T03:59:14+5:302014-12-29T03:59:14+5:30
राज्यपाल एन. एन. व्होरा यांच्यासोबत पुढच्या आठवड्यात होणाऱ्या चर्चेच्या अगोदर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीने (पीडीपी) जम्मू-काश्मिरात
श्रीनगर : राज्यपाल एन. एन. व्होरा यांच्यासोबत पुढच्या आठवड्यात होणाऱ्या चर्चेच्या अगोदर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीने (पीडीपी) जम्मू-काश्मिरात सरकार स्थापन करण्यासाठी संभाव्य आघाडीबाबत विचारविमर्श सुरू केला आहे.
राज्यात सरकार स्थापन करण्याच्या विविध शक्यता पडताळून पाहण्यासाठी पक्षाने नवनिर्वाचित आमदारांसोबत रविवारी अनौपचारिक चर्चा केली, असे पीडीपीचे प्रवक्ते नईम अख्तर यांनी सांगितले. भाजपासोबत युती करण्यासह सर्वच पर्याय पीडीपीसाठी खुले आहेत, असे नमूद करून अख्तर म्हणाले, राज्यपालांसोबत पक्ष नेतृत्वाची बैठक होण्यापूर्वी आम्ही पक्षात मतैक्य घेण्याच्या प्रक्रियेत आहोत.
व्होरा यांनी शुक्रवारी पीडीपी आणि भाजपा यांना वेगवेगळे पत्र पाठवून त्यांच्या नेत्यांना सरकार स्थापन करण्याच्या संदर्भात १ जानेवारीपूर्वी चर्चा करण्याचे आमंत्रण दिले आहे.
काल पीडीपीने सरकार स्थापन करण्यासाठी भाजपापुढे काही अटी ठेवल्या होत्या. राज्यघटनेच्या कलम ३७० वरील पक्षाच्या भूमिकेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे पीडीपीने याआधीच जाहीर केले आहे. (वृत्तसंस्था)