मुताऱ्यांच्या रचनेवर झाली मुंबई महापालिकेत चर्चा
By admin | Published: September 25, 2014 05:18 AM2014-09-25T05:18:32+5:302014-09-25T05:18:32+5:30
महिलांसाठी मुंबई शहरात असलेल्या मुताऱ्या किती, त्यांची अवस्था काय या सर्वांचा लेखाजोखा शुक्रवारी महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्यासमोर मांडण्यात येणार आहे
मुंबई : महिलांसाठी मुंबई शहरात असलेल्या मुताऱ्या किती, त्यांची अवस्था काय या सर्वांचा लेखाजोखा शुक्रवारी महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्यासमोर मांडण्यात येणार आहे. बुधवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर परत एकदा मुताऱ्यांची रचना कशी असावी याविषयी चर्चा झाली. या वेळी राईट टू पी कार्यकर्त्यांनी दिलेल्या सूचना महापालिकेने ऐकून घेतल्या आणि याची अंमलबजावणी कशी करता येईल, याविषयी चर्चा केली.
महिलांसाठी मोफत, स्वच्छ, सुरक्षित आणि सार्वजनिक मुताऱ्या असाव्यात, यासाठी गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या चळवळीला काही प्रमाणात यश येताना दिसत आहे. मुंबईतील सर्व वॉर्डमधील स्वच्छतागृहांचा आढावा घेतला गेला आहे. यामध्ये महिलांसाठी राखीव मुतारी नसल्याचे आढळून आले आहे. यामुळे स्वच्छतागृहामध्ये यासाठी एक राखीव ब्लॉक असावा यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत. महिलांसाठी असणाऱ्या मुताऱ्यांमध्ये कोणत्या सुविधा हव्यात, त्यांची रचना कशी असावी, या सगळ््या गोष्टींचा बारकाईने अभ्यास करून आरटीपीने आराखडा तयार केला आहे.
महापालिकेतील प्रमुख अभियंता (घनकचरा विभाग) प्रकाश पाटील यांच्यासमोर आरटीपी कार्यकर्त्यांनी मुताऱ्यांची रचना विशद करून सांगितली. यात मुताऱ्यांचा रंग काळा-लाल असावा, तिथे एक कचऱ्याचा डबा असावा, पाणी, साबण असावा यापासून ते अशिक्षित महिलेला देखील कळण्यासाठी त्याचे चिन्ह कसे असावे, अशी सगळी तपशीलवार माहिती दिली. मात्र एकाच स्वच्छतागृहामध्ये एकाच व्यक्तीला बसवता येणे शक्य आहे, महिला आणि पुरुष दोघांना कसे बसवणार, स्वच्छतेसाठी देखभाल ठेवण्याचा प्रश्न आहे, अशा महापालिका अधिकाऱ्यांनी शंका उपस्थित केल्या. यावर आरटीपी कार्यकर्त्यांनी उपाय सुचवले. याविषयी चर्चा करू असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. (प्रतिनिधी)