पाकिस्तानशी चर्चा म्हणजे देशाचा विश्वासघात - काँग्रेस
By admin | Published: December 7, 2015 12:19 PM2015-12-07T12:19:19+5:302015-12-07T12:35:24+5:30
बँकॉकमध्ये भारत-पाकिस्तान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांदरम्यान झालेल्या बैठकीमुळे विरोधक भडकले असून पाकिस्तानशी झालेली चर्चा म्हणजे देशाचा मोठा विश्वासघात असल्याची टीका काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी केली.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ७ - बँकॉकमध्ये भारत-पाकिस्तान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांदरम्यान झालेल्या बैठकीमुळे विरोधक भडकले असून पाकिस्तानशी झालेली चर्चा म्हणजे देशाचा मोठा विश्वासघात असल्याची टीका काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी केली आहे. रविवारी थायलंडची राजधानी बँकॉक येथे भारत-पाकिस्तान यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक पार पडली. चार तास चाललेल्या या बैठकीत उभय देशांनी दहशतवाद आणि जम्मू काश्मीरसह विविध मुद्यावर चर्चा करीत रचनात्मक संवाद सुरू ठेवण्यावर सहमती दर्शवली. पॅरिसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानी समकक्ष नवाज शरीफ यांच्यातील संक्षिप्त भेटीच्या केवळ सहा दिवसानंतर दोन्ही राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक झाल्याने ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे. मात्र या बैठकीमुळे विरोधक चांगलेच भडकले आहेत.
यापूर्वी गत २३ आॅगस्टला नवी दिल्लीत डोवाल आणि पाकचे तत्कालीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अजीज यांच्या बैठक होणार होती. मात्र पाकिस्तानी उच्चायोगाने हुरियत नेत्यांना दिलेल्या निमंत्रणावरून उभय देशांत तणाव निर्माण झाला होता आणि ही बैठक रद्द झाली होती. अजीज यांनी नवी दिल्लीत हुरियत नेत्यांना भेटण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे भारताने स्पष्ट केले होते. यानंतर पाकने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावरील बैठक रद्द केली होती.
दोन देशांदरम्यान (भारत -पाकिस्तान) तिस-या देशात जाऊन चर्चा होते, यावरूनच त्यांचे संबंध कसे आहेत हे स्पष्ट होतं असे सांगत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारला टोला हाणला. तसेच पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारे संबंध ठेवण्यावर शिवसेनेचा विश्वास नाही, असेही ते म्हणाले.