पंतप्रधानांची शहा, जेटली यांच्याशी चर्चा
By admin | Published: May 21, 2016 04:23 AM2016-05-21T04:23:15+5:302016-05-21T04:23:15+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी भाजप अध्यक्ष अमित शहा आणि वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या सल्लामसलत केली
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदल आणि भाजपच्या धोरणात्मक मंडळांची फेररचना करण्यात येणार असल्याची कुजबूज होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी भाजप अध्यक्ष अमित शहा आणि वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या सल्लामसलत केली. त्यांच्यात काय चर्चा झाली, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तथापि , माहितगार सूत्रांनुसार मंत्रिमंडळ आणि पक्षांतर्गत फेरबदलासंदर्भात चर्चा झाली असावी. मोदी यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली.
तथापि, भाजपच्या सूत्रांनी सांगितले की, राजकीय स्थितीचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ नेते चर्चा करीत असतात. उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक जवळ येत असल्याने केंद्रात या राज्याला अधिक प्रतिनिधीत्व दिले जाण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले.
अमित शहा यांनी काल, गुरुवारी मात्र या फेरबदलाबाबत विचारलेल्या प्रश्नाला बगल देत यासंदर्भात अद्याप निर्णय घेण्यात आला नसल्याचे सांगितले. भाजप अध्यक्ष म्हणून अमित शहा यांच्या हाती दुसऱ्यांदा धुरा देण्यात आल्याने पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतही बदल केले जाण्याची शक्यता आहे.
११ आणि १२ जून रोजी भाजप राष्ट्रीय कार्यकारीणीची बैठक होणार असून त्याआधीच पक्ष संघटनात्मक फेरबदल व कार्यकारीणी सदस्यांची घोषणा केली जाणार आहे. सरकार आणि पक्ष संघटनेत एकाचवेळी बदल करण्याचा पंतप्रधानांचा मानस आहे. काही मंत्र्यांवर पक्षाची जबाबदारी टाकली जाईल. मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी हा फेरबदल होण्याची दाट शक्यता आहे.
>पंतप्रधान ७ जूनपासून अमेरिकेच्या दौऱ्यावर
नवी दिल्ली /वॉशिंग्टन : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ७ जून रोजी अमेरिकेच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते व्हाइट हाउसमध्ये अध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेतील आणि उभय देशांतील सुरक्षा, ऊर्जा तसेच अन्य क्षेत्रांत झालेल्या प्रगतीचा आढावा घेतील. शिवाय ते अमेरिकी काँग्रेसच्या संयुक्त बैठकीलाही संबोधित करतील.