सुरक्षा दलांतील चर्चा; पाकचे शिष्टमंडळ भारतात

By Admin | Published: September 10, 2015 03:29 AM2015-09-10T03:29:42+5:302015-09-10T03:29:42+5:30

भारत आणि पाकिस्तानच्या सीमा सुरक्षा दलांदरम्यान महासंचालक स्तरावरील चर्चा गुरुवारपासून नवी दिल्लीत सुरू होत असून यावेळी भारतातर्फे सीमेवर वारंवार होणारे शस्त्रसंधी

Discussion of security forces; Pakistan delegation to India | सुरक्षा दलांतील चर्चा; पाकचे शिष्टमंडळ भारतात

सुरक्षा दलांतील चर्चा; पाकचे शिष्टमंडळ भारतात

googlenewsNext

नवी दिल्ली/ अमृतसर : भारत आणि पाकिस्तानच्या सीमा सुरक्षा दलांदरम्यान महासंचालक स्तरावरील चर्चा गुरुवारपासून नवी दिल्लीत सुरू होत असून यावेळी भारतातर्फे सीमेवर वारंवार होणारे शस्त्रसंधी उल्लंघन आणि घुसखोरीसारखे महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले जातील. अलीकडेच उभय देशांदरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) स्तरावरील चर्चा रद्द झाली असताना ही बैठक होत आहे.
दोन्ही देशांमधील वाढत्या तणावातच बैठकीत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानचे एक १६ सदस्यीय शिष्टमंडळ बुधवारी येथे डेरेदाखल झाले. पाकिस्तानी प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व रेंजर्सचे महासंचालक (पंजाब) मेजर जनरल उमर फारुक बुर्की करीत असून अमृतसरजवळील अटारी वाघा सीमेवर पंजाब फ्रंटियरच्या सीमा सुरक्षा दलाच्या वरिष्ठ कमांडरने त्यांचे स्वागत केले. यापूर्वी डिसेंबर २०१३ मध्ये लाहोरला महासंचालक स्तरावरील बैठक झाली होती. दीड वर्षाच्या खंडानंतर ही बोलणी होत आहेत. पाकिस्तानी शिष्टमंडळात सिंध रेंजर्सच्या अधिकाऱ्यांशिवाय तेथील गृहमंत्रालय, सर्व्हे आॅफ पाकिस्तान, अमली पदार्थविरोधी दल आणि स्थलांतरण विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे, तर २३ सदस्यीय भारतीय दलाचे नेतृत्व सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) महासंचालक डी.के. पाठक करीत आहेत. पाकिस्तानी उच्चायोगातील सूत्रानुसार भारत आणि पाकिस्तानदरम्यान संयुक्त राष्ट्र सैन्य निरीक्षक गट सक्रिय बनविण्यावर पाककडून जोर दिला जाईल. संयुक्त राष्ट्र गटाची प्रासंगिकता आता राहिली नसल्याचे भारताचे म्हणणे आहे.
दोन्ही देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, सीमेवर गस्त घालणाऱ्या दोन्ही देशांच्या सुरक्षा दलांचे महासंचालक व दोन्ही देशांच्या लष्करांचे ‘मिलिटरी आॅपरेशन्स’चे महासंचालक या विषयावर मोदी व नवाज शरीफ चर्चेवर एकमत झाले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)

भारताचे चर्चेतील अपेक्षित मुद्दे
जम्मू-काश्मीर सीमेवर होणारे शस्त्रसंधीचे उल्लंघन. आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी सैनिकांकडून कुठल्याही चिथावणीशिवाय होणाऱ्या गोळीबारात निष्पाप नागरिक आणि जवानांचे मृत्यू होत आहेत.
बीएसएफच्या वतीने श्वेत झेंड्याला दुसऱ्या बाजूने प्रतिसाद मिळत नसल्याचाही मुद्दा उपस्थित केला जाईल. गोळीबार थांबविण्याचे संकेत या श्वेत झेंड्याने दिले जातात.
विविध स्तरावरील संवाद, परस्पर समन्वयाने गस्त आणि विश्वासार्हता वाढविणारे इतर विषय.
गुजरातमधील कच्छच्या रणालगतच्या हरामी नाल्यात होणारी घुसखोरी, सीमेपलीकडून अमली पदार्थांची तस्करी, आंतरराष्ट्रीय सीमेवर झीरो लाईन क्षेत्रात संशयास्पद बेकायदेशीर हालचाली

पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; २ जवान जखमी
श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या कूपवाडा आणि पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करून केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचे दोन जवान जखमी झाले. मंगळवारी रात्री पूंछमध्येही पाकने आगळीक केली. त्याला भारतीय जवानांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले.
भारतीय अधिकाऱ्यांच्या घरगुती वापराच्या वस्तू अडविल्या
नवी दिल्ली : इस्लामाबाद येथील भारतीय उच्चायुक्तालयातील चार मुत्सद्दी अधिकाऱ्यांसाठी भारतातून पाठविण्यात आलेली घरगुती वापराच्या वस्तूंची पार्सले पाकिस्तानने महिनाभरापासून वाघा सीमेवर अडवून ठेवली आहेत. भारतातर्फे पाकिस्तानी परराष्ट्र कार्यालयाला वेळोवेळी सूचना देण्यात आल्यानंतरही रेंजर्सनी हे सामान संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचते केले नाही. भारत-पाक महासंचालक स्तरावरील बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे.

Web Title: Discussion of security forces; Pakistan delegation to India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.