डिसलाइकचा धसका, मोदींच्या भाषणावेळी भाजपाच्या पेजवरील बटण केलं बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 07:29 PM2020-10-20T19:29:24+5:302020-10-20T20:24:25+5:30
Narendra Modi News : पंतप्रधानांचे भाषण सुरू असतानाच भाजपाच्या पेजवर सुरू असलेल्या भाषणाच्या खालील डिसलाईकचे बटण बंद करण्यात आले होते.
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशवासियांना संबोधित केले. यावेळी नरेंद्र मोदींनी कोरोनाविरोधात देशाची स्थिती चांगली असल्याचे सांगतानाच लस येईपर्यंत कोरोनाविरोधातील लढाई कायम ठेवावी लागेल, असे आवाहन देशवासियांना केले, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण सुरू असतानाच ट्रोलिंगची भाजपाला वाटत होती. त्यामुळे पंतप्रधानांचे भाषण सुरू असतानाच भाजपाच्या पेजवर सुरू असलेल्या भाषणाच्या खालील डिसलाईकचे बटण बंद करण्यात आले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आज देशवासियांसाठीचे संबोधन जेमतेम ५ ते १० मिनिटे चालले. दरम्यान, या संबोधनावेळी मोदींचे भाषण सुरू असताना यूट्युब पेजवर मोठ्या प्रमाणात डिसलाईक येऊ लागल्या. त्यामुळे किती जणांनी लाईक किंवा डिसलाईक केलंय ते दिसणार नाही, असं सेटिंग भाजपाच्या आयटी सेलने केले. दरम्यान, काही वेळाने या भाषणाच्या व्हिडिओखालील कमेंटही बंद करण्यात आल्या.
दरम्यान, आज देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, गेल्या काही महिन्यांत कोरोनाविरोधातील लढाईत देशाने मोठा टप्पा पार केला आहे. इतर देशाच्या तुलनेत भारतातील स्थिती चांगली आहे. हळूहळू बाजारातील लगबग वाढत आहे. मात्र याच काळात देशात बेफिकीरी वाढत आहे. लॉकडाऊन संपला आहे, पण कोरोना नाही. कोरोना विषाणूचा फैलाव वाढू नये यासाठी खबरदारी घेतली पाहिजे. काही बेजबाबदार लोक स्वत:ला आणि आपल्या कुटुंबालाही धोक्यात घालतात. आता सणावाराचे दिवस आहेत. मात्र थोडीशी बेफिकीरी जीवन उद्ध्वस्त करू शकते. तुम्ही तुमचे कुटुंबीय सुरक्षित, सुखी दिसावे, अशी माझी इच्छा आहे. कोरोनाविरोधातील लस अजून आलेली नाही. त्यामुळे लस येईपर्यंत कोरोनाविरोधातील लढाई कायम ठेवावी लागेल, असे आवाहन मोदींनी केले आहे.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाविरोधात देशात करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबतही माहिती दिली. मोदी म्हणाले की, कोरोना काळात कोरोनाबाधित रुग्णांसाठी ९० लाखांहून अधिक बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच १२ हजार क्वारेंटाइन सेंटर उभारण्यात आली आहेत. देशात सध्या २० कोरोना चाचणी करणाऱ्या लॅब आहेत. तसेच देशात आतापर्यंत झालेल्या कोरोना चाचण्यांचा आकडा लवकरच १० कोटींचा टप्पा पार करणार आहेत.