७ रुपये जास्त मिळाल्याने नोकरीवरून काढले; शिक्षेने सदसद्विवेकबुद्धीला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 09:39 AM2023-07-04T09:39:45+5:302023-07-04T09:39:52+5:30

काेर्ट म्हणाले, पुन्हा कामावर घ्या...

Dismissed for earning Rs 7 more; Punishment shocks the conscience | ७ रुपये जास्त मिळाल्याने नोकरीवरून काढले; शिक्षेने सदसद्विवेकबुद्धीला धक्का

७ रुपये जास्त मिळाल्याने नोकरीवरून काढले; शिक्षेने सदसद्विवेकबुद्धीला धक्का

googlenewsNext

चेन्नई : अचानक केलेल्या तपासणीमध्ये बॅगेत केवळ ७ रुपये जास्त निघाल्याने तामिळनाडू राज्य परिवहन महामंडळाने (टीएनएसटीसी) आठ वर्षांपूर्वी एका कंडक्टरला कामावरून काढून टाकले होते. आता मद्रास उच्च न्यायालयाने टीएनएसटीसीला फटकारले असून एका आठवड्यात कंडक्टरला पुन्हा कामावर घेण्याचे आदेश दिले आहेत.

कोर्ट सुनावणीवेळी म्हणाले की, कंडक्टरला सुनावलेल्या शिक्षेने न्यायालयाच्या सदसद्विवेकबुद्धीला धक्का बसला. २०१५ चे हे प्रकरण आहे. तामिळनाडू राज्य परिवहन महामंडळा (विल्लुपुरम विभाग) ने बसमध्ये तपासणी केली. यावेळी बस कंडक्टर अय्यानार यांच्या कलेक्शन बॅगमधून तिकिटानुसार ७ रुपये जास्त आढळून आले होते.

चुकीची शिक्षा...
महामंडळाच्या या निर्णयाला अय्यानार यांनी वकील एस. एलमभारथी यांच्या मदतीने मद्रास उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती पी. बी. बालाजी यांनी महामंडळाला फटकारले. ते म्हणाले की, ७ रुपये अधिक घेतल्याने महामंडळाचा महसूल बुडाला असे म्हणण्याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. अय्यानारला देण्यात आलेली शिक्षा ही गुन्ह्याच्या तुलनेत अत्यंत चुकीची आहे. त्यामुळे न्यायालयाच्या सदसद्विवेकबुद्धीला धक्का बसतो.

कंडक्टर काय म्हणाला? 
अय्यानार यांचे वकील एलमभारथी यांनी महामंडळाचे आरोप फेटाळून लावले. बसमध्ये एक महिला चढली होती, तिला जवळच जायचं होतं. अय्यानारने तिला पाच रुपयांचे तिकीट दिले. प्रवासादरम्यान महिलेचे तिकीट हरवले आणि तपासणीदरम्यान भीतीमुळे तिने कंडक्टरवर तिकीट न दिल्याचा आरोप केला. त्याचवेळी कलेक्शन बॅगेत सापडलेले दोन रुपये त्यांना एका प्रवाशाला परत द्यायचे होते.

काय होते आरोप? 
महामंडळाने अय्यानार यांच्यावर कामात हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला. तिकिटाचे पैसे घेऊनही त्यांनी एका महिला प्रवाशाला तिकीट दिले नाही. तपासादरम्यान त्याच्या कलेक्शन बॅगेत सात रुपयांपेक्षा जास्त रक्कम आढळून आली. महामंडळाचे नुकसान करण्याचे काम त्यांनी केले आहे. तो जबाबदार कर्मचारी नव्हता, असा आरोप करण्यात आला होता.

कोर्ट काय म्हणाले? 
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने म्हटले की, अय्यानारच्या वकिलाने केलेल्या युक्तिवादावर आम्ही समाधानी आहोत. अय्यानार यांना आठवडाभरात पुन्हा कामावर घेण्यात यावे.

Web Title: Dismissed for earning Rs 7 more; Punishment shocks the conscience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.