भाजपात नाराज, राहुल गांधींनी काँग्रेसमध्ये नाकारले, आता या पक्षात जाणार वरुण गांधी? चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 01:50 PM2023-01-23T13:50:06+5:302023-01-23T13:50:40+5:30
Varun Gandhi : भाजपामध्ये नाराज असलेले खासदार वरुण गांधी यांच्या राजकीय वाटचालीबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. तसेच त्यांच्या भावी वाटचालीबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.
नवी दिल्ली - भाजपामध्ये नाराज असलेले खासदार वरुण गांधी यांच्या राजकीय वाटचालीबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. तसेच त्यांच्या भावी वाटचालीबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. गेल्या काही काळापासून वरुण गांधी स्वत:च्याच पक्षावर टीका करत आहेत. ते काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र राहुल गांधी यांनी त्यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मात्र आता वरुण गांधी हे समाजवादी पक्षामध्ये जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
उत्तर प्रदेशमधील पिलीभीत येथून खासदार असलेल्या वरुण गांधींकडे समाजवादी पक्षामध्ये जाण्याचा पर्याय खुला आहे. तसेच ते समाजवादी पक्षात जाऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीवेळीही अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र तेव्हा त्यांचा समाजवादी पक्षात प्रवेश होऊ शकला नव्हता.
वरुण गांधी यांच्या समाजवादी पक्षामध्ये प्रवेश करण्याच्या चर्चांनी पुन्हा वेग घेण्यामागे दोन कारणे आहेत. पहिलं कारण म्हणजे हल्लीच वरुण गांधी यांनी अखिलेश यादव यांचं कौतुक केलं होतं. तर दुसरं कारण म्हणजे शिवपाल यादव यांनी केलंलं एक विधान. त्यात शिवपाल यादव यांनी भाजपाच्या भ्रष्ट सरकारला हटवण्यासाठी जो कुणी सोबत येईल, त्याचं स्वागत आहे, असं विधान केलं होतं.
वरुण गांधी हे सातत्याने आपल्या पक्षाविरोधात भूमिका घेत आहेत. बेरोगजारी, शेतकरी आणि इतर मुद्द्यांवरून ते सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. मात्र त्यांच्या विधानांना भाजपाने अद्याप गांभिर्याने घेतलेलं नाही. एकीकडे वरुण गांधी हे आपल्याच पक्षावर टीका करत सुटले असताना त्यांची आई आणि भाजपा खासदार मनेका गांधी या मात्र पक्षासोबत दिसत आहेत. हल्लीच त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती. तेव्हा त्यांच्यासोबत सुल्तानपूरमधील सर्व आमदार उपस्थित होते.