मुलीच्या प्रेमप्रकरणामुळे नाराज वडिलांनी सोशल मीडियावर व्हायरल केला तिचा प्रायव्हेट व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 06:55 PM2024-07-13T18:55:18+5:302024-07-13T18:55:53+5:30
Karnataka Crime News: मुलीच्या प्रेमप्रकरणामुळे नाराज असलेल्या एका पित्याने त्याच्या मुलीचे खासगी व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. या प्रकारामुळे धक्का बसलेल्या मुलीने फिनाईल प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.
वडील आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना कर्नाटकमधील उडुपी येथून समोर आली आहे. येथे मुलीच्या प्रेमप्रकरणामुळे नाराज असलेल्या एका पित्याने त्याच्या मुलीचे खासगी व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. या प्रकारामुळे धक्का बसलेल्या मुलीने फिनाईल प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच उपचार झाल्याने ती बचावली. आता तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून या पित्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार उडुपीच्या सीईएन पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका व्यक्तीच्या मुलीचं तीर्थ हल्लीमध्ये राहणाऱ्या एका नातेवाईकासोबत प्रेमप्रकरण सुरू होतं. दोघेही एकमेकांना नियमितपणे भेटायचे. मात्र हे नातं मुलीच्या वडिलांना अमान्य होतं. त्यांनी मुलीला याबाबत अनेकदा दमदाटी केली होती. मात्र सज्ञान असल्याने मुलीने त्याच मुलासोबत लग्न करण्याचा तगादा लावला होता. त्यामुळे हे वडील संतप्त झाले होते.
काही दिवसांपूर्वी या मुलीच्या वडिलांनी तिच्या प्रिसकराला घरी बोलावले होते. तसेच त्याला बेदम मारहाण केली. एवढंच नाही तर त्याचा मोबाईल हिसवाकून घेऊन त्यामध्ये असलेले मुलीचे प्रायव्हेट फोटो आणि व्हिडीओ काढून घेतले. नंतर ते सोशल मीडियावर शेअर केले. एवढंच नाही तर त्यांनी मुलगी आणि पत्नीला बेदम मारहाण केली. त्यात हे दोघेही जखमी झाले. तसेच हे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने मुलीला धक्का बसला.
त्यानंतर या तरुणीने फिनाईल पिऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्या आईने तिला वेळीच रुग्णालयात नेले. सध्या तिची प्रकृती स्थिर असली तरी चिंताजनक आहे. पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पित्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.