त्रिपुरात खातेवाटपावरून टिपरा मोथा पक्षात नाराजी, पक्षाचे नेते भेटणार अमित शाहना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 12:47 PM2024-06-13T12:47:43+5:302024-06-13T12:48:42+5:30
लोकसभा निवडणुकीपूर्वी, भाजपच्या नेतृत्वाखालील त्रिपुरा सरकारमध्ये मंत्री बनलेले टिपरा मोथा पक्षाचे नेते अनिमेश देबबर्मा यांनी सांगितले की, त्यांना मिळालेल्या खात्यांबद्दल ते नाराज आहेत आणि यासंदर्भात ते केंद्रीय गृहमंत्री आणि एनडीएचे अध्यक्ष अमित शाह यांच्या समोर हा मुद्दा मांडण्याचा विचार करत आहेत.
आगरतळा - लोकसभा निवडणुकीपूर्वी, भाजपच्या नेतृत्वाखालील त्रिपुरा सरकारमध्ये मंत्री बनलेले टिपरा मोथा पक्षाचे नेते अनिमेश देबबर्मा यांनी सांगितले की, त्यांना मिळालेल्या खात्यांबद्दल ते नाराज आहेत आणि यासंदर्भात ते केंद्रीय गृहमंत्री आणि एनडीएचे अध्यक्ष अमित शाह यांच्या समोर हा मुद्दा मांडण्याचा विचार करत आहेत. येथे पत्रकारांशी बोलताना देबबर्मा म्हणाले की, त्यांनी हा मुद्दा मुख्यमंत्री माणिक साहा यांच्याकडे आधीच मांडला आहे.
मला वाटप करण्यात आलेल्या विभागांवर मी खूश नाही. वन विभाग ठीक आहे, पण मुद्रण लेखनसामग्री आणि विज्ञान तंत्रज्ञान हे खाते माझ्या कामाचे नाही. काही दिवसांपूर्वी मी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. नंतर मी त्यांना भेटलो आणि विनंती केली की, मला काही महत्त्वाची खाती द्यावी, जेणेकरून मी ग्रामीण लोकांना मदत करू शकेन. यासंदर्भात लवकरच आपण दिल्लीला जाऊन गृहमंत्री शाह यांची भेट घेणार असून, त्यांच्यासमोरही आपला मुद्दा मांडणार आहे, असे देबबर्मा यांनी सांगितले.
मार्चमध्ये राज्य सरकारमध्ये सामील झाल्यानंतर तत्कालीन विरोधी पक्षनेते अनिमेश देबबर्मा आणि ब्रिष्केतू देबबर्मा यांना मंत्री करण्यात आले. ब्रिष्केतू यांना उद्योग आणि वाणिज्य खात्याचे राज्यमंत्री बनवण्यात आले, तर अनिमेश यांच्याकडे वन विभागासह मुद्रण व लेखनसामग्री आणि विज्ञान व तंत्रज्ञान विभागाची जबाबदारी देण्यात आली.